परभणी जि.प.च्या कारभारात भलताच गोंधळ सुरू आहे. सोयीनुसार निर्णय घेणे व त्याचा अर्थही सोयीनुसारच काढून प्रशासकीय कामकाजात सर्व काही अलबेल असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. शिक्षण विभागातील वैद्यकीय बिल प्रतिपूर्तीचे काम पाहणाऱ्या एका लिपिकाने एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या बिलासाठी पैसे मागितल्याचे वृत्त एका ठिकाणी प्रसिद्ध झाले. त्याची तातडीने दखल घेत सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी जि.प.ची प्रतिमा मलिन झाल्याच्या कारणावरून त्या कर्मचाऱ्याची (निलंबन किंवा अन्य कारवाईला बगल देऊन) इतरत्र बदली केली व संपूर्ण शिक्षण विभागाची चाैकशी केली; परंतु मग्रारोहयोच्या सहायक बीडीओंना माध्यमिक उपशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार दिल्यानंतर याबाबत माध्यमांत सातत्याने ओरड होऊन व शिक्षण आयुक्तांपर्यंत हे प्रकरण गेल्यानंतही त्यात जि.प. प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे वाटले नाही. आता ३३७ शिक्षकांची वैद्यकीयची प्रतिपूर्तीची बिले प्रशासनाने अनेक महिन्यांपासून अडवल्याचा जि.प. सदस्यांनी सर्वसाधारण सभेत आरोप केला. त्यावेळी मात्र प्रतिमा मलिन झाल्याचे प्रशासनास वाटले नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भ्रामक प्रतिमेला मलिनतेचा शालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:18 AM