परभणी विभागीय कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांत जवळपास २ हजार ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात दोन-तीन महिने कर्मचाऱ्यांना पगारासाठी वाट पाहावी लागली तर दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर झाला असला तरी वर्षभरापासून वैद्यकीय बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे जून, जुलै महिन्याचे पगार अद्यापही झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन वेळेत पगार होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
उत्पन्न कमी, खर्च जास्त
परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी या चार आगारांमधून सुटणाऱ्या बसेसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. एसटी महामंडळ प्रशासनाकडून खर्च करण्यात येत असला तरी उत्पन्न कमी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होण्यासही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कोरोनाची भीती दूर करून एस.टी.ने प्रवास केल्यास उत्पादनात भर पडू शकते.
परभणी विभागात कर्मचाऱ्यांचेच वेतन झाले नसल्याने कर्मचाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच नियमित वैद्यकीय उपचार घेत असलेले कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले जानेवारी २०२० पासून प्रलंबित आहेत तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचेदेखील रजेत रोखीत रूपांतर करून देखील २०२० पासून वेतन अदा केले गेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालय परभणी येथे विनाकारण फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे कामगारांची मानसिकता ढासळत आहे. कर्मचारी यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे रा. प. च्या वतीने सदर रक्कमेची तरतूद करून तत्काळ रखडलेले वेतन अदा करावे. अन्यथा संघटनेच्यावतीने आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल.
गोविंद वैद्य
विभागीय सचिव
महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना
चालक, वाहक यांना नियमित कर्तव्य मिळत नाही. आगार पातळीवर चालक, वाहकांची पिळवणूक करून कर्तव्य न मिळाल्यास परिपत्रकीय सूचनेनुसार हजेरी देणे आवश्यक असताना काही कर्मचारी यांच्याकडून सक्तीने रजा घेतली जात आहे. काही कर्मचारी यांच्या रजा शिल्लक नसल्याने वेतन मिळत नाही. अशा घटना प्रशासनाच्यावतीने न थांबल्यास आंदोलन करण्यात येईल.
मनोहरराव गावंडे
परभणी विभागात चालक, वाहक यांना आगारात आवश्यकता भासल्यास सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा वापर करणे आवश्यक आहे. आगार पातळीवर याबाबत अंमलबजावणी केली जात नाही. विभागाच्यावतीने त्याबाबत सूचना प्रसारित करून अथवा आदेश देऊनदेखील अंमलबजावणी होत नाही.
ज्ञानोबा साबळे