लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी विधानसभेच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्र मिळून लढणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात काहीशी संभ्रमावस्था असली तरी युतीचा धर्म पाळून जो उमेदवार दिला जाईल, त्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले जाईल, असे प्रतिपादन खा.बंडू जाधव यांनी केले.पाथरी विधानसभा मतदारसंघातील परभणी ग्रामीण भागातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे शुक्रवारी परभणीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.जाधव बोलत होते. व्यासपीठावर समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाटगे पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा.पंढरीनाथ धोंडगे, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, मंगलाताई कथले, तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुुले, रंगनाथ वाकणकर, जि.प. सदस्य जनार्दन सोनवणे, देविदास कच्छवे, माणिक आव्हाड, युवा सेनेचे दीपक बारहाते, प्रल्हाद लाड, माजी जि.प.अध्यक्ष उत्तमराव कच्छवे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा.बंडू जाधव म्हणाले की, निवडणुका या पक्षासाठी जिंकायच्या असतात. व्यक्ती या गौण आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नेते माझ्या विरोधात होते; परंतु, जनता आणि सच्चे शिवसैनिक आपल्या सोबत होते. त्यामुळेच अनेकांचे अंदाज चुकवित विजय मिळविला. परभणी जिल्ह्यातील जनता शिवसेनेवर भरभरुन प्रेम करते. उमेदवार कोण आहे, हे पाहण्याऐवजी फक्त धनुष्यबाण पाहून मतदान करते. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होणार आहे. त्यामुळे युतीचा जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याचे प्रत्येकाने मनापासून काम करावे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार विजय होतील, याच दृष्टीकोनातून प्रत्येकाने कामाला लागावे. परभणी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे; परंतु, बाकी तीन विधानसभा मतदारसंघात काहीशी संभ्रमावस्था आहे. त्यामुळे कोणता मतदारसंघ शिवसेनेकडे राहील व कोणता मतदारसंघ भाजपाकडे जाईल, हे आताच सांगता येणार नाही. वरिष्ठ पातळीवरुन यासंदर्भात निर्णय होईल. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी युतीचा धर्म पाळून प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. इच्छुक उमेदवारांनी उद्यापासूनच प्रत्येक गावात जावून ग्रामस्थांशी संवाद साधावा. शिवसैनिकांशी बोलावे. शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती जनतेला द्यावी, असेही ते म्हणाले. पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. दोन वेळा येथून पक्षाने विजय मिळविला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना सतीश घाटगे म्हणाले की, परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे मोठे काम आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी कोणालाही मिळो, निष्ठेने शिवसेनेचे काम करेल. खा.बंडू जाधव जो निर्णय देतील, तो आपणास मान्य राहील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश इक्कर यांनी केले.
परभणीत शिवसेनेचा मेळावा; युतीचा धर्म पाळावाच लागेल-बंडू जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:22 PM