लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महिलांचा विकास करण्यासाठी शिवसेना शिक्षण, सुरक्षा, स्वास्थ्य, स्वावलंबन आणि समता या पंचसुत्रीनुसार काम करणार असल्याचे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सोमवारी येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना केले़शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी येथे ‘प्रथम ती’ या राज्यस्तरीय महिला संमेलनाचे परभणीत आयोजन करण्यात आले होते़ यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाकरे बोलत होत्या़ व्यासपीठावर आ़ डॉ़ राहुल पाटील, शिवसेनेच्या नेत्या शिल्पा सरपोतदार, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, उद्योजिका कमलताई परदेशी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सखूबाई लटपटे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संप्रिया पाटील, अंबिका डहाळे, प्रा़ दिलीप मोरे आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना अध्यक्षा ठाकरे म्हणाल्या की, बचत गटाच्या माध्यमातून महिला आता सक्षम बनल्या असून, त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे़ अॅमेझॉनसारख्या कंपन्या बचत गटाचे उत्पादन आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहेत़ महिला बचत गटांकडून प्रामाणिकपणे काम केले जाते़ आज काही उद्योगपती कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन फरार झाले आहेत, असे असताना बचत गटातील महिलांनी तब्बल २ हजार ७०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले़ त्याअंतर्गत एकही बँक खाते एनपीएमध्ये आले नाही़ कर्जाची १०० टक्के परतफेड महिलांनी केली़ महिलांच्या विकासासाठी शिवसेना सुरक्षा, स्वास्थ्य, स्वावलंबन, समता आणि शिक्षण या पंचसूत्रीनुसार काम करणार आहे़ त्याच दृष्टीकोणातून शिवसेनेच्या वतीने ‘प्रथम ती’ हे महिला संमेलन आयोजित केले असून, त्याची सुरुवात परभणी येथून होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी कमलताई परदेशी, शिल्पा सरपोतदार आदींनी मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन मनीषा उमरीकर यांनी केले़बचत गटांचा महासंघ स्थापन करणार- राहुल पाटील४महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला मुंबई, पुणे येथे बाजारपेठ मिळवून देण्याची शिवसेनेची जबाबदारी आहे़ यासाठी महासंघाची स्थापना करण्यात येणार असून, त्यांना योग्य ते आर्थिक सहकार्यही केले जाणार आहे़ परभणी येथे महिलांची पहिली नागरी सहकारी पतसंस्था आपल्या पुढाकारातून उभारण्यात आली़ खाजगी सावकारीला चाप लावण्यासाठी स्थापन केलेही ही पतसंस्था राष्ट्रीयकृत बँकांच्या १ टक्के कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते़ पतसंस्थेच्या माध्यमातून बचत गटांना मदत केली जात असताना इतर राष्ट्रीयकृत बँकांमार्फतही महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, परभणी विधानसभा मतदारसंघ आदर्श मतदार संघ बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे ते म्हणाले़
शिवसेना पंचसूत्रीने काम करणार : ज्योती ठाकरे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:49 AM