परभणी : आले किती गेले किती, उडत गेला फरारा, संपला नाही आणि संपणारही नाही शिवसेनेचा दरारा, या ओळींच्या माध्यमातून शिवसेनेच्या कारकिर्दीचे वर्णन करुन परभणीतील एका शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने पक्षप्रमुखांना पत्र लिहून आपली शिवसेनेप्रती असलेली निष्ठा मांडली आहे.
राज्यात शिवसेनेमध्ये बंडाळी झाल्यानंतर अनेक जण शिवसेनेतून बाहेर पडले. या बंडखोरांच्या विरुध्द अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी अनेकांनी आंदोलन, मोर्चे, निषेध व्यक्त करुन मांडली. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा गेल्या ३० वर्षांपासूनचा बालेकिल्ला आहे. येथे शिवसैनिकांच्या रक्तात गद्दारी नाही, याची प्रचिती राज्यातील झालेल्या या बंडानंतर दिसून आली. जिल्ह्याचे खासदार, आमदार यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी शिवसैनिक म्हणूनच जोमाने काम करीत आहेत. या सर्व बाबींचा शिवसैनिकांना अभिमान आहे. हीच बाब परभणी शहरातील दर्गा रोड भागातील बँक कॉलनी येथील शिवसैनिक विजय खिस्ते पाटील यांनी शिवसेनेतील बंडाळीनंतर पक्षाविषयीची निष्ठा एका पत्राद्वारे प्रगट केली.
बदलत्या काळात सगळीकडे सोशल माध्यमावर मत मांडले जात आहे. मात्र, विजय खिस्ते पाटील या निष्ठवान शिवसैनिकाने मंगळवारी सायंकाळी स्वतःच्या शरीरातील रक्त ब्लड बँकेत जाऊन सिरींजद्वारे काढून या रक्ताद्वारे दोन पानांचे पत्र पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे. हे पत्र सोशल माध्यमातून व्हायरल झाले. त्यामुळे याची चर्चा झाली. पत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसैनिक हा लढवय्या असून परभणीतील सर्व शिवसैनिक पक्षासोबतच आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसैनिकांची निष्ठा ही मातोश्रीवर आहे. सर्वजण मातोश्रीसाठी काम करू, अशा भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत. विजय खिस्ते यांनी रक्ताने लिहिलेल्या पत्राची परभणीत चर्चा रंगली आहे.
आमदारांकडे पत्र केले सुपूर्दनिष्ठावंत शिवसैनिक विजय खिस्ते यांनी शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर शिवसेनेला समर्थन म्हणून आपल्या स्वतःच्या रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी पत्र लिहिले आहे. ते पत्र आमदार डॉ.राहुल पाटील यांच्याकडे त्यांनी बुधवारी परभणीत सुपूर्द केले. हे पत्र मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, उपशहरप्रमुख संभानाथ काळे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, प्रा.गजानन काकडे, राहुल कांबळे, कैलास पतंगे उपस्थित होते.