रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी शिवजन्माचा पाळणा गाऊन सुरुवात करण्यात आली. तसेच महिलांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून फटाक्यांची आतिषबाजी केली. यावर्षी प्रथमच कोरोनामुळे मिरवणूक रद्द झाल्याने शिवप्रेमी नागरिकांमधून सरकार विरोधात नाराजी दिसून आली. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी संभाजी ब्रिगेड व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रांगोळी ठरली आकर्षण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त जीवन कौशल्य आर्टसचे संचालक ज्ञानेश्वर बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी कांचन तळेकर व दुर्गा बिडवे यांनी ५ तासाच्या अथक परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक रांगोळीतून कलाकृती साकार केली. त्यामुळे शिवजन्मोत्सव सोहळ्यात रांगोळी आकर्षक ठरली.
राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांचे महाराजांना अभिवादन
जिंतूर- सेलू विधानसभेच्या आ. मेघना बोर्डीकर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे,नगराध्यक्षा सबिया कफील फारुकी,उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे,बाजार समितीचे मुख्य प्रशासक मनोज थिटे,गटनेते गोपाळ रोकडे,नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी कंठाळे,सावता परिषदेचे दत्ता काळे,सुनील भोंबे व शिवप्रेमींनी अभिवादन केले.