परभणी : वातानुकूलित रेल्वे डब्यात बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना परभणीच्या एका माजी नगरसेविकेच्या पतीने जबर मारहाण केल्याची घटना ९ एप्रिलला नांदेड-पुणे एक्स्प्रेस रेल्वेमध्ये घडली, याप्रकरणी १८ एप्रिलला नांदेड रेल्वे पोलिसांत एकावर गुन्हा नोंद झाला आहे.
नांदेड येथील २२ वर्षीय दोन विद्यार्थी पुणे येथे जाण्यासाठी पुणे एक्स्प्रेसला बसले होते, यातील एक जण बी-१ आणि दुसरा बी-३ डब्यात होता. नांदेड ते पूर्णा दरम्यान रेल्वेत परभणीचा प्रसाद ऊर्फ बबलू केशवराव नागरे हा बी-३ डब्ब्यात आला, यावेळी त्याची व विद्यार्थ्यांची जागेवर बसण्यावरून कुरबुर झाली, त्यावेळी नागरे याने विद्यार्थ्यांला जबर मारहाण केली. ही घटना मुलाने त्याच्या पालकाला तर पालकांनी परभणी पोलिसांना कळवली. परभणी पोलिसांनी पूर्णा पोलिसांना घटनेची माहिती दिली. रेल्वेत पूर्णा पोलिसांनी बबलू याला डब्याखाली उतरवून त्याची कानउघाडणी केली.
पूर्णाहून गाडी निघताच बबलू पुन्हा बी-३ डब्यात चढला आणि 'तू पोलिसांना बोलावतोस का? असे म्हणून पुन्हा त्या विद्यार्थ्यांला मारहाण केली. घाबरलेला विद्यार्थी बी-१ मधील त्याच्या मित्राजवळ जाऊन बसला, तेथेही नागरेने त्याला सोडले नाही. तो तेथे पोहोचला व त्याने विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांने मारहाण केली. दुसऱ्या विद्यार्थ्यांला' हा कोण लागतो रे तुझा?' अशी विचारणा नागरेने केली, 'तो माझा मित्र आहे' असे उत्तर मिळताच नागरेने त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याने विद्यार्थ्यांच्या छातीत लाथा मारल्या. परभणीला गाडी येताच नागरे उतरून निघून गेला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी पुणे येथे पोहोचताच विद्यार्थ्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. मारहाणीमुळे दोन्ही विद्यार्थी घाबरले होते. १८ एप्रिलला ही तक्रार नांदेड रेल्वे पोलिसांत देण्यात आली. बबलू नागरेविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले. पोलिस निरीक्षक संतोष उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.