गंगाखेड (परभणी ) : पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या ताराच्या कुंपणात सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५) सकाळी महातपुरी फाट्या जवळील शेतात घडली. सुवर्णा नामदेव मोहिते (३५ ) असे मृत महिलेचे नाव आहे.
शहरापासून जवळच असलेल्या महातपुरी फाट्याजवळील दुधाटे यांच्या शेतात नामदेव मोहिते ( रा. कापसी ता.पालम ह.मु. गंगाखेड ) सालगडी म्हणून काम करतात. ते शेतातच पत्नी सुवर्णा नामदेव मोहिते (३५ ) यांच्यासोबत राहतात. गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सुवर्णा मोहिते प्रात:विधीसाठी शेत आखाड्यापासून जवळच असलेल्या वाघमारे यांच्या शेताजवळून जात असताना त्यांचा पाय तारेच्या कुंपणावर पडला. या कुंपणात उसाचे रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. यामुळे सुवर्णा मोहिते यांना विजेचा जोरदार धक्का बसून त्या जखमी झाल्या.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुवर्णा मोहिते या पाच महिन्याच्या गर्भवती होत्या अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वसीम खान यांनी दिली आहे. सपोनि विकास कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, पो. ना. रामकीशन कोंडरे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाची हद्द गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे की सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे स्पष्ट झाले नसल्याने दुपारी चार वाजेपर्यंत याप्रकरणी गुन्ह्या नोंद करण्यात आला नव्हता.