परभणी : पाथरी येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या एका वृद्धाने शेतात जाऊन विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या शेतकऱ्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून माजी आ. बाबाजानी दुर्राणींसह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला.
याबाबत पाथरी पोलिसांत मयताचा मुलगा अजयसिंह पाथरीकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, १२ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास त्यांचे वडील बाळकृष्ण शंकरराव कांबळे हे शेतात गेले होते. पाथरीनजीकच्या माळीवाडा शिवारात आखाड्यावर कोंबड्या व बदके पाळली असून, त्यांना चारापाणी करून ते रात्री दहा वाजेपर्यंत घरी परतायचे. मात्र, ते आले नाहीत. त्यामुळे १३ ऑगस्टला पहाटे त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल केला, तर प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्यक्ष शेतात गेल्यावर ते मृतावस्थेत आढळले. त्यानंतर, घरच्यांशी व पोलिसांशी अजयसिंह यांनी संपर्क साधला. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून पाथरी येथील सरकारी रुग्णालयात प्रेत नेले. तेथे पंचनामा करीत असताना मयताच्या पँटच्या खिशात चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत माजी आमदार अब्दुला खान लतिफ खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्राणी यांच्याविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात दोन सविस्तर तक्रारी दिल्या. उपलोकायुक्तांकडेही २०२१ पासून दोन ते तीन तक्रारी दिल्या. माझे नातेवाईक स्वार्थी आणि शेवटचे शेजारी यांच्या त्रासाला व न्याय न देणारे प्रशासन आणि राजकीय स्वार्थी तत्त्वहीन कार्यकर्ते यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले. यात माझ्या कुटुंबीयांचा संबंध नसल्याचेही म्हटले.
प्लॉटिंगचे पैसे दिले नाहीअजयसिंह यांच्या तक्रारीत म्हटले की, बाबाजानी यांनी माजलगाव रोडवरील कॅनालजवळील प्लॉट, तसेच शेतजमिनीमधील पडलेली प्लॉटिंग यामध्ये वडिलांना ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही. त्यामुळे वडील तणावात असायचे, तर चकरा मारूनही त्यांना पैसे दिले नाही. शेजारी विजय प्रभाकर वाकडे रा. भीमनगर याच्यासह आमचे नातेवाईकही त्रास देत होते. त्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात बीएनएस १०८, ३ (५) व अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम १९८९ मधील ३ (२) (व्हीए) यानुसार गुन्हा नोंद झाला.
हे तर राजकीय षडयंत्र : दुर्राणीमयत बाळकृष्ण हा कधी काळी माझा कार्यकर्ता होता. त्याला निराधार समितीचे अध्यक्ष केले होते. वर्षभरापूर्वी तो शिवसेना शिंदे गटात गेला होता. त्याच्याशी माझा कधी वादविवादही झाला नव्हता. मात्र, पक्षांतर करून तो ज्यांच्यासोबत गेला, त्यांनी त्याला हाताशी धरून माझ्याविरुद्ध हे राजकीय षडयंत्र केले. काही लोकांनी राजकारणाचा सगळा स्तर घालविला आहे, अशी प्रतिक्रिया माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.