पाथरी : शेतात तीन बॅग सोयाबीनची पेरणी केली मात्र पेरलेले 75 टक्के सोयाबीन उगवले नाही. कृषी विभागाने दोन दिवसांपूर्वी पंचनामा ही केला, परंतु आता दुबार पेरणीसाठी पैसे नसल्याने विवंचनेत असलेल्या तालुक्यातील मरडसगाव येथील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. विष्णू उद्धव शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ही घटना 26 जून रोजी रात्री उशिरा उघडकीस आली.
सध्या मराठवाडाभर सोयाबीनची पेरणी वाया गेल्याच्या तक्रारी आहेत. पेरलेले बियाणे बहुतेक ठिकाणी उगवलेच नसल्याने तक्रारीचा पाऊस पडत आहे. पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथील शेतकरी विष्णू उद्धव शिंदे (40) यांनी आपल्या तीन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. अल्पभूधारक शेतकरी असल्याने शेतात पेरणीसाठी दुसऱ्याचे बैल आणून पेरणी करावी लागली, पेरलेले सोयाबीन 25 टक्के ही उगवले नाही. दोन दिवसांपूर्वी कृषी विभागाने पेरलेल्या सोयाबीनचा पंचनामा ही केला होता मात्र दुबार पेरणी कशी करावी या विवंचनेत शिंदे होते.
26 जून रोजी दुपारी शेतात गेल्या नंतर रात्री उशिरापर्यंत घरी पोहचले नसल्याने आणि मोबाईलवरील कॉलही उचलत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी बाजूच्या आखाड्यावर फोन करून माहिती घेतली. रात्री 10 च्या सुमारास त्यांचे प्रेत लिंबाच्या झाडाला लटकत असल्याचे दिसून आले. आज सकाळी 27 जून रोजी त्यांचे भाऊ दत्ता उद्धव शिंदे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात या बाबत माहिती दिली त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे दुपारी 12 वाजेपर्यंत पाथरगव्हाण बु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टेम सुरू होते त्यांच्या पश्चात 2 मुले पत्नी असा परिवार आहे.