जिंतूर : शेतातील आखाड्यावर राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या बॅटरीला डिटोनेटरच्या काड्याचे कनेक्शन लावल्याने मोठा स्फोट झाला. यात स्फोटात दोन्ही मुले गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, जिंतूर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना रोडवरील शेख सलीम यांच्या आखाड्यावर शाहिद पठाण सालगडी म्हणून राहतात. ह्यांचा मुलगा अमन शाहिदखा पठाण (१३) व शेख असलम शेख अब्दुल (१०) हे दोघे व जालना रोडवर असलेल्या वाशिंग सेंटरजवळ खेळत होती. याच वाशिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या एका गोदामाजवळ त्यांना ब्लास्टिंगसाठी जिलेटिनच्या कांड्या असलेला डिटोनेटरचा संच पडलेला दिसला.
कुतुहूल म्हणून या मुलांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी काढून त्याचे कनेक्शन डिटोनेटर लावले. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात अमन शाहिदखा पठाण यांच्या डाव्या हाताची पाचही बोटे व उजवा डोळा निकामी झाला. तर शेख असलम शेख अब्दुल याच्या डाव्या डोळ्यावरील भागाला खोलवर इजा झाली. स्फोटाचा आवाज ऐकून नागरिकांनी तिकडे धाव घेतली. गंभीर जखमी मुलांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.