परभणी : कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असून, सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धास्ती वाढली आहे. त्यामुळे आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. मागील वर्षीही जिल्ह्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. आतापर्यंत रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता असली तरी धास्ती नव्हती. मात्र मागच्या दोन दिवसांपासून दररोज प्रत्येकी तीन रुग्ण कोरोनाने दगावल्याने आता मात्र धास्ती वाढली आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांना स्वत:हून काळजी घेत मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सचे पालन या त्रिसूत्रीचे गांभीर्याने पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणारा १ आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ३३७ वर पोहोचली आहे. दुसरीकडे मंगळवारी रुग्णांची संख्याही वाढली असून, ५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ५९७ अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ४७० अहवालात २९ आणि रॅपिड टेस्टच्या १२७ अहवालात ३० जण पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात आता एकूण रुग्णसंख्या आठ हजार ९३८ झाली आहे. त्यापैकी आठ हजार २६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ७९, खासगी रुग्णालयात ७२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे १७८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
या भागात आढळले रुग्ण
परभणी शहरातील आनंदनगर (३), एसपी ऑफिस (२), आशीर्वादनगर, यशवंतनगर, धनलक्ष्मीनगर, नवा मोंढा, ज्ञानेश्वरनगर, कच्छी बाजार, धनलक्ष्मीनगर जिंतूररोड, हडको, संभाजीनगर, दत्तनगर (३), रामकृष्णनगर, गांधी पार्क, परभणी तालुक्यातील आर्वी (७), सोन्ना, नानलपेठ (२), संतसेनानगर, गव्हाणे रोड, दर्गा रोड, जिंतूर शहरातील इटोलीकर गल्ली (३), मेनरोड, ग्रीन पार्क, तालुक्यातील कौसडी (२), जि.प. शाळा बोरी, पूर्णा तालुक्यातील देऊळगाव (२) या भागात रुग्णांची नोंद झाली आहे.
सेलू तालुक्यातील वालूर (२), पालम तालुक्यातील डिग्रस, मानवत शहरातील त्रिमूर्तीनगर, गंगाखेड तालुक्यातील सिरसम.