परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे दुपारी चार वाजल्यानंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही निर्बंधकाळात खुलेआम व्यवसाय होत आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांना सवलत दिली आहे. दुसरीकडे प्रशासनही सैल झाले असून, निर्बंधकाळात सर्रास व्यवसाय सुरू असताना कारवाई मात्र केली जात नाही. त्यामुळे निर्बंधांचे आदेश कागदावरच असून, बाजारपेठेतील गर्दी निर्बंधकाळानंतरही कायम राहत आहे.
एकही कारवाई नाही
कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर जिल्ह्यात चार वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू झाली आहे. त्यानंतर दुकाने बंद ठेवायची आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाने उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. मात्र दुसऱ्या लाटेत एकही कारवाई नाही.
गुजरी बाजार
परभणी शहरातील गुजरी बाजाराच्या भागात दुपारी चारनंतर घेतलेले हे छायाचित्र. निर्बंध असतानाही दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.
स्टेशन रोड
परभणी शहरातील स्टेशन रोडच्या परिसरातील या दुकानांत शटर बंद करून व्यवहार सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. कारवाई मात्र झाली नाही.
किराणा हवा की जेवण?
दुपारी चारनंतर मुख्य बाजारपेठेतील मोठी दुकाने बंद राहत असली तरी बाजारपेठ वगळता इतर भागांत मात्र कोणतीही वस्तू खुलेआम मिळत आहे. किराणा असो की एखाद्या हॉटेलमध्ये आता नाश्ता, जेवणही मिळत आहे. त्यामुळे निर्बंध केवळ नावालाच असून, रात्री उशिरापर्यंत व्यवसाय होत आहेत.
या दुकानांवर लक्ष कोणाचे?
शहरी भागामध्ये महानगरपालिका आणि नगरपालिका प्रशासनाला दुकानांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. या संस्थांनी पथकांची स्थापना करून निर्बंधकाळात बाजारपेठेच्या भागात फिरून उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र मागील दीड महिन्यात परभणी शहरासह जिल्ह्यात अशी कारवाई झालेली नाही.