मंगळवरच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना, विविध कामगार संघटना आणि सेवाभावी संस्थांनी बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी सकाळपासूनच शहरातील व्यापारपेठ कडकडीत बंद राहिली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शहरातून मोटारसायकलवरून काही जणांनी बंदचे आवाहन केले. त्यासही व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी बस वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अनेक दिवसांनंतर बसस्थानकावर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
दरम्यान, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील शिवाजी चौकात विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. तीनही कृषी कायदे शेतकरीविरोधी असून ते रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, माजी महापौर प्रताप देशमुख, नदीम इनामदार, ॲड. स्वराजसिंह परिहार, राजन क्षीरसागर, विजय वाकोडे, ॲड. माधुरी क्षीरसागर, श्रीधरराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, सुनील देशमुख, गुलमीर खान, विनय बांठिया, अमोल जाधव, विनोद कदम, जयश्री खोबे, जानुबी आदींनी शहरातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शहरातील बसस्थानक परिसरातील उड्डाणपुलावर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
गांधीपार्क, क्रांती चौकात शुकशुकाट
देशव्यापी बंदमध्ये लघु विक्रेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेट परिसरात भाजीविक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग लावत मंगळवारी बाजार भरविला नाही. त्यामुळे या भागात शुकशुकाट पाहावयास मिळाला. त्याचप्रमाणे शहरातील गांधी पार्क, क्रांती चौक, अष्टभूजा देवी मंदिर परिसर, नानलपेठ, जुना मोंढा, नवा मोंढा या भागात व्यापारपेठ बंद असल्याने दिवसभर शुकशुकाट होता.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ११ ठिकाणी आंदोलन
भारत बंददरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शहरासह झरी, पेडगाव, झिरो फाटा, सेलू, पूर्णा, पालम, गंगाखेड आदी अकरा ठिकाणी रास्ता रोको, संयुक्त मोर्चा आणि बंदचे आंदोलन केले. परभणी येथे कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनासाठी अप्पा कुऱ्हाडे, लक्ष्मण काळे, सय्यद इब्राहीम, दत्ता मोरे, ज्ञानेश्वर काळे, नवनाथ कोल्हे, मुंजा लिपणे, ओंकार पवार, शेख सरवर, तुषार पालकर आदींनी प्रयत्न केले.