परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथेच मंजूर करावे, या मागणीसाठी सुरू केलेल्या सर्वपक्षीय मोहिमेत आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या सह्या करून या मोहिमेला गती दिली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट व्हावी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी परभणी येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली जात आहे. त्यातूनच एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने आपला अहवालही दिला आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक ओपीडी असलेले जिल्हा रुग्णालय, मराठवाड्यातील मध्यवर्ती ठिकाण यासह वैद्यकीय महाविद्यालयासाठी या ठिकाणी असलेल्या भौतिक सुविधा पाहता, जिल्ह्याला हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणे सोयीचे आहे. मात्र हा प्रश्न अद्यापपर्यंत निकाली निघाला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अद्यापही ठोस निर्णय झाला नसल्याने २२ ऑगस्टपासून जिल्ह्यात सर्वपक्षीय सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असून, आतापर्यंत सुमारे एक लाख नागरिकांनी ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’साठी सह्या केल्या आहेत.
शहरात प्रभागनिहाय मोहीम
शहरातही प्रभागनिहाय सह्यांची मोहीम राबविली जात आहे. २६ ऑगस्ट रोजी येथील उड्डाणपूल परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी माणिक पोंढे, अंगदराव अंभोरे, प्रकाश डहाळे, रामा कुलथे, मोहन टाक, अभिजित खानापुरे, बंडू बोखारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.