पाथरी : कोविड-१९ मुळे इतर क्षेत्राबरोबरच रेशीम शेतीलाही मोठा फटका बसला होता. रेशीम कोषाचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. मागील आठ महिन्यानंतर पहिल्यांदाच रेशीम कोषाचा भाव वाढला असून, १८० रुपये किलोवरून थेट ३६० रुपये प्रतीकिलो भाव झाला आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील रेशीम उत्पादनाचे सर्वाधिक क्षेत्र मराठवाड्यात आहे. मराठवाड्यातील रेशीम कोष दर्जेदार असल्याने त्यास भावही अधिक मिळतो. मागील काही वर्षात मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा कलही या शेतीकडे वळला आहे. कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील रामनगर येथे रेशीम कोष विक्रीसाठीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. राज्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी या बाजारपेठेची निवड करतो. मात्र कोविड-१९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीसाठी बाजारपेठेपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. परिणामी रेशीम कोषाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. कधीकाळी ५०० रुपये किलोपेक्षा जास्त दराने विक्री होणाऱ्या कोषाला १०० ते १५० रुपये प्रती किलोचा दर मिळाला. परभणी जिल्ह्यात पूर्णा येथे एकमेव रेशीम खरेदी मार्केट असल्याने शेतकऱ्यांना इतर ठिकाणी विक्री करण्याची सोय नसल्याने अधिक भाव मिळाला नाही. आता रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाल्याने कर्नाटक राज्यातील बाजारपेठेत रेशीम कोष विक्रीस नेता येत आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत रेशीम कोषाचे दर वाढले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रेशीम कोषाचे दर १८० वरून ३६० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. त्यामुळे ८ ते ९ महिन्यानंतर रेशीम कोषाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात ८८८ हेक्टरवर रेशीम शेती
परभणी जिल्ह्यात मनरेगा आणि इतर योजनेत साधारणपणे ८८८ हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. मागील वर्षी रेशीम कोषासाठी जिल्ह्यात साधारणपणे ३ लाख १४ हजार अंडीपुंज शेतकऱ्यांकडून मागणी केली होती. त्यातून शेतकऱ्यांना १६७ टन कोष उत्पादन झाले होते. यावर्षी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते नोव्हेंबरअखेर १ लाख २१ हजार ४५९ अंडीपुंज मागविण्यात आले होते. त्यातून ६७ टन रेशीम कोष निर्मिती झाली आहे. बाजारपेठेत आता दर वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत.
मेहनती शेतकऱ्यांचे पीक म्हणजे रेशीम शेती आहे. भावात चढउतार होत असल्याने त्याचा फटका बसला असला तरी आता भाव वाढल्याने तोटा भरून निघेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत हरू नये.
-वैभव खुडे, रेशीम उत्पादक शेतकरी, सिमूरगव्हाण
लाॅकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील पूर्णा येथील रेशीम बाजारपेठेत कोष उत्पादक शेतकऱ्यांना कोषाची विक्री करण्यासाठी सोय झाली. भाव कमी मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे कोषाचे नुकसान झाले नाही.
-जी.आर. कदम, रेशीम विकास अधिकारी, परभणी