सेलू :- वालूर महसूल मंडळाचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील यादीत समावेश करावा आणि सर्व नुकसानग्रस्तांना सरसकट मदत करावी या मागणीसाठी रायगड कॉर्नर येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सेलू तालुक्यातील वालूर , चिकलठाणा, सेलू, देऊळगाव , कुपटा या पाचही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरीपातील मुग, सोयाबीन, कापूस, उडीद आणि फळ बागांचे नुकसान झाले. नदी, ओढा, नाला काठावरील जमीनी खरडून गेल्या आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे विहीरीसुद्धा गाळ साचला आहे. मात्र महावेध प्रकल्पाकडून घेतलेल्या पावसाच्या नोंदीवरून प्रशासनाने केवळ सेलू, कुपटा, चिकलठाणा, देऊळगाव या चार मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद केली. यामुळे वालूर मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
यामुळे वालूर गावाचा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांच्या यादीत समावेश करावा आणि सर्व नुकसानग्रस्तांना सरसकट मदत करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळी रायगड कॉर्नर येथे अर्धा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी या प्रश्नावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदनावर दतराव मगर, माजी सभापती रविंद्र डासाळकर उपसभापती सुंदर गाडेकर, जयसिंग शेळके, दगडोबा जोगदंड, शिवहरी शेवाळे, भागवत दळवे, अॅड रामेश्वर शेवाळे चंद्रकांत चौधरी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.