परभणी : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परभणी शहरामध्ये मंगळवारी रात्री सापळा रचून एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता यामध्ये पांढऱ्या खताच्या दहा पोत्यामध्ये ६०० किलो ग्रॅम बनावट खवा जप्त केला. सुमारे एक लाख ८० हजार रुपये किमतीचा हा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्न औषधी प्रशासनाने नमुने तपासणीसाठी व पुढील कारवाईसाठी घेतले आहेत.
दिवाळी सणानिमित्त खव्याची मागणी बाजारपेठेत वाढलेली असते. त्या अनुषंगाने काही व्यापारी बनावट दुग्धजन्य पदार्थ विकतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेत पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या आदेशान्वये व मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन जण वाहन क्रमांक (एमएच २२ एएन १९०५) यामध्ये बनावट दुग्धजन्य पदार्थ परभणी शहरात घेऊन येत असल्याची माहिती समजली. त्यावरून पोलिसांनी नवा मोंढा ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून सदरील वाहन थांबवून तपासणी केली. यात पांढऱ्या रंगाच्या खताच्या दहा पोत्यात सहाशे किलोग्रॅम बनावट खवा मिळून आला. ज्याचे बाजार मूल्य एक लाख ८० हजार रुपये एवढे आहे.
यामध्ये चालक सोमनाथ रंगनाथ शिंदे (२६, रा. साकला प्लॉट) व वाहन मालक किशोर सुधाकर मुळे (३१ रा.ज्ञानेश्वर नगर, परभणी) यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर वस्तू खवा असून तो सुनील राज पुरोहित (रा.नांदेड) यांच्याकडून घेऊन संदीप राज पुरोहित यांना देण्यासाठी आणला असल्याचे सांगितले. सदर पदार्थ बनावट असल्याचा संशय आल्याने दुग्धजन्य पदार्थ अन्न व संशोधन प्रशासन विभागामार्फत तपासणीसाठी देण्यात आला आहे. या नमुने तपासणी अहवालानंतर पूढील प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, शेख रफियोदिन, निलेश परसोडे यांनी केली.