बोरी (जि.परभणी) : जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षांसह ६ जणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी रोहिला येथे २८ आॅगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष इर्शाद पाशा चाँद पाशा यांच्यासह पाच ते सहा जणांनी जिल्हा परिषद शाळेला पदवीधर शिक्षक नसल्याच्या कारणावरुन कुलूप ठोकले होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेता आली नाही. तसेच शाळेत जाण्यास शिक्षकांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शाळेचे केंद्रप्रमुख मिर्झा एजाज बेग यांच्या फिर्यादीवरुन इर्शाद पाशा चाँद पाशा यांच्यासह सहा जणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.