जिल्ह्यात मागील काही दिवसापासून वाळूची अवैध मार्गाने वाहतूक केली जात आहे. महसूल यंत्रणा मात्र याविरुद्ध कुठलीही कारवाई करीत नाही. अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यास कारवाई केली जात आहे. २८ एप्रिल रोजी एक टिप्पर विनापरवाना वाळू घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पालम तालुक्यातील पेठ शिवणी परिसरामध्ये सापळा लावला. त्यात एम.एच.१६/क्यू.७८८८ या क्रमांकाचा टिप्पर जप्त करण्यात आला. तसेच टिप्परमधील १८ हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळूही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी विष्णू गिरजाजी शेरकर व शशिकांत शिवाजी रोडगे (दोघे रा. धनगर टाकळी, ता. पूर्णा ) यांच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगेवाड तपास करीत आहेत.
चोरटी वाळू वाहतूक; टिप्परसह दोघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:12 AM