सेलू ( परभणी ), दि. ६ : एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावल्या प्रकरणी सेलू पोलिसांच्या ताब्यात एक आरोपी अटकेत होता. आज पहाटे ५. 30 वाजे दरम्यान त्याला शौचास सोडल्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत हातकडीसह संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. नारायण प्रकाश तिवार असे पलायन केलेल्या आरोपीचे नवा असून त्याच्या शोधासाठी ४ पथके विविध दिशेने रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे स्टेशन परिसरात दसर्याच्या दिवशी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावणार्या नारायण प्रकाश तिवार ( रा.राजीव गांधी नगर,सेलू ) या अारोपीस नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रंगेहात पकडले होते.अारोपीकडून हिसकावलेले गंठणही पोलिसांनी हस्तगत केले होते. या प्रकरणी त्यास पोलिसांनी अटक करून सेलू न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.
आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याला शौचास जाण्यासाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी त्याने अंधाराचा फायदा घेत पोलिस कर्मचार्याच्या हाताला झटका देत हातकडीसह संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ पोलिस पथक विविध दिशेने रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटना आणि आरोपीचे दूसर्यांदा पलायन या घटना पाहता सेलू पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.