परभणी : रेल्वेस्थानकावर रविवारी (दि.१७) ३ ते ४ वर्षाचा एक बेवारस मुलगा पोलिसांना सापडला. त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला नसल्याने त्यास सध्या जीवन आशा ट्रस्टच्या आशा शिशूगृहात दाखल केले आहे.
१७ जून रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पनवेल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी परभणी रेल्वेस्थानकावर आली तेव्हा प्लॅट फॉर्म २ व ३ च्या दरम्यान ३ ते ४ वर्षाचा हा मुलगा एकटाच फिरत असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना दिसला. पोपटी रंगाचा टी-शर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट या मुलाने घातली आहे. मुलाकडे नाव, गाव व पालकांविषयी विचारपूस केली; परंतु, त्याला काहीच बोलता आले नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी बालसमितीच्या अध्यक्षांसमोर हजर केले.
मुलाच्या देखभाल, संरक्षण आणि संगोपनासाठी या मुलास आशा शिशूगृहात दाखल करण्यात आले आहे. रंगाने काळा, लांबसर चेहरा, सरळ नाक, काळे डोळे असे या मुलाचे वर्णन असून त्याला हिंदी भाषा थोडी थोडी समजते. या मुलाविषयी किंवा त्याच्या पालकाविषयी माहिती असल्यास अध्यक्ष बालकल्याण समिती, जुना पेडगावरोड परभणी, अधीक्षक आशा शिशूगृह नवा मोंढा परभणी, बाल संरक्षण अधिकारी, कल्याणनगर परभणी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.