सोनपेठ : तालुक्यासह परिसरातील इतर तालुक्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मानवत रोड-पाथरी-सोनपेठ-परळी हा रेल्वेमार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मानवत रोड-परळी हा लोहमार्ग व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना, प्रवासी व नागरिकांनी पाठपुरावा केला. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर सोनपेठसह पाथरी, मानवत तालुक्यातील नागरिकांसाठी या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे. तसेच पाथरी येथील साईबाबांचे मंदिर व परळी येथील वैद्यनाथ मंदिर ही दोन देवस्थाने या लोहमार्गाने जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर या तिन्ही तालुक्यांतील गावांचा विकास होणार आहे. शिवाय, व्यापारास गती मिळणार असून, बेरोजगार तरुणांच्या हाताला यातून मोठा राेजगार उपलब्ध होवू शकतो. तसेच मानवत रोड-पाथरी-सोनपेठ-परळी हा परिसर रेल्वेमार्गाने जोडला तर दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यातून सोनपेठ तालुक्याचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात तरी या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कृषी, औद्योगिक विकासासाठी ठरणार फायदेशीर
तालुक्यातील कृषी उत्पादन व औद्योगिक विकासासाठी मानवत रोड-पाथरी-सोनपेठ-परळी हा प्रस्तावित रेल्वेमार्ग झाल्यानंतर तालुक्यातील कृषी मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होवू शकते. तसेच या रेल्वे मार्गामुळे औद्योगिक विकासालाही गती येणार आहे.