परभणी : निकृष्ट दर्जाचे सोयाबीनचे बियाणे दिल्याच्या जिल्ह्यात १२ हजार ५०० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून, त्यातील ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पंचनामे कृषी विभागाने केले आहेत. असे असले तरी अद्याप त्यांना मोबदला देण्याच्या अनुषंगाने कसलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते़ त्यापैकी ५ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी १ लाख ७८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, १ लाख ४४ हजार १६६ हेक्टरवर कापूस तर ३४ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी केल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे़ विश्ोष म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला़ त्यामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस व सोयाबीनची पिके चांगली बहरली; परंतु, जिल्ह्यातील १२ हजार ५०० शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या़
तालुका कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या या तक्रारींच्या अनुषंगाने आतापर्यंत ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या जवळपास १२ हजार हेक्टर जमिनीवरील पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले आहेत़ कृषी विभागाने पंचनामे केलेल्यांचा अहवाल बियाणे कंपन्यांना सुपूर्द केला आहे; परंतु, अद्यापपर्यंत एकाही बियाणे कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतलेला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना उसणवारी व सावकारांचे उंबरवठे झिजवून पैसे मिळवित सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली; परंतु, या कंपन्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक रुपयांचीही मदत केलेली नाही़ केवळ कृषी विभागाकडे काही कंपन्यांनी आम्ही शेतकऱ्यांना रोखीने मदत करू, असे पत्र दिले आहे़ मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे तक्रारदार सोयाबीन उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे़
ईगल कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईगल या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीविषयी ४ हजार २८५ तक्रारी केल्या आहेत; परंतु या कंपनीने अद्यापपर्यंत कोणतीही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही़ शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे़ त्यापाठोपाठ १ हजार ३५० महाबीज, ८१५ ग्रीन गोल्ड, सारस, गोदाफार्म आदी कंपन्यांची बियाणे सदोष असल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी कार्यालयास प्राप्त झाल्या़ या कंपन्यांकडे कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठविला आहे़ मात्र, मदतीसाठी अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़.