परभणी : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विकसित केलेल्या बिजनेस डेव्हलपमेंट युनिटच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ हजार ६६१ टन सोयाबीन १५ मार्च रोजी प्रथमच मालगाडीने गुजरातमधील गांधीधाम येथे पाठविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता परराज्यातील बाजारपेठ शेतमाल पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
नगरसोल येथून किसान रेल्वेने कांदा आणि द्राक्षे देशभरात पाठविले जात आहेत. मराठवाड्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आतापर्यंत या सोयाबीनची वाहतूक ट्रक, टेम्पोच्या साह्याने मराठवाड्यात आणि विदर्भात केली जात होती. १५ मार्च रोजी गुजरात राज्यातील गांधीधाम येथे परभणी जिल्ह्यातील २ हजार ६६१ टन सोयाबीन रेल्वेच्या मालवाहतुकीने रवाना करण्यात आले. परभणी रेल्वेस्थानकावरून बीसीएन वॅगन्समधून हे सोयाबीन पाठविण्यात आले. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परराज्यात सोयबीन पाठविण्याची संधी प्राप्त झाली आहे.
दमरेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांच्या संकल्पनेतून बिजनेस डेव्हलपमेंट युनिट कार्यरत करण्यात आले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय रेल्वेने मालवाहतूक वाढविण्यावर भर दिला आहे. रेल्वे डब्यांमध्ये माल चढविण्यापासून ते माल उतरविण्यापर्यंत पाठपुरावा केला जात आहे. या अंतर्गत नांदेड विभागातील बिजनेस डेव्हलपमेंट युनिटचे अधिकारी विविध क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांशी संवाद साधून रेल्वेने माल वाहतुकीचे महत्त्व पटवून देत आहेत. सुरक्षित आणि कमी खर्चात रेल्वेच्या साह्याने मालवाहतूक केली जात असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.