लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हैदराबाद ते पूर्णा या पॅसेंजर रेल्वे गाडीच्या ब्रेकजवळ अचानक स्पार्किंग होऊन आगीच्या ठिणग्या पडल्याने रेल्वे थांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास परळी ते उखळी दरम्यान घडली.हैदराबादहून परळीमार्गे पूर्णा जाणारी ५७५४७ या क्रमांकाची पॅसेंजर रेल्वे नियमितपणे परळी येथे ५.३५ मिनिटांनी येते. शुक्रवारी ही रेल्वे नियमित वेळेप्रमाणे उशिराने आली. परळी ते उखळी रेल्वे स्टेशन दरम्यान या रेल्वे गाडीच्या मध्यभागी असलेल्या एका डब्याच्या खालील बाजुस असलेल्या ब्रेकजवळ अचानक स्पार्किंग झाल्याने आगीच्या ठिणग्या उडण्यास सुरुवात झाली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात आली. त्यानंतर काही प्रवाशांनी चैन ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली. त्यानंतर ही माहिती तातडीने चालकास देण्यात आली. जवळपास १५ ते २० मिनिटे ही रेल्वे थांबल्यानंतर रेल्वेच्या अधिकाºयांनी पाहणी केली. त्यानंतर स्पार्किंग थांबल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ही रेल्वे गंगाखेडच्या दिशेने रवाना झाली. या संदर्भातील अधिकृत माहिती मात्र रेल्वेकडून देण्यात आली नाही.
परभणीत रेल्वेच्या ब्रेकजवळ झाली स्पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:09 AM