परभणी : पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी आरसीपी प्लाटून रूमला गुरुवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास अचानक भेट देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यामध्ये एकूण सात पोलीस कर्मचारी पैशावर पत्ते खेळत असल्याचा प्रकार त्यांना आढळून आला. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी गंभीर दखल घेतली. तत्काळ संबंधित पोलिसांविरुद्ध नवा मोंढा पोलिसात गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया राबविली.
परभणी पोलीस दलातील आरसीपी कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह स्वरुपात एक रुम कार्यरत ठेवली आहे. एखाद्या गंभीर प्रसंगात गरज पडल्यावर या राखीव विशेष प्लाटूनला बंदोबस्तासाठी घटनास्थळी बोलावले जाते. गुरुवारी रात्री तेथे असलेले सात पोलीस कर्मचारी आरसीपी प्लाटून रूममध्ये एकत्र कार्यरत होते. यावेळी पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारी आरसीपी प्लाटून रूममध्ये गुरुवारी रात्री अचानक भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.
यामध्ये सात जण पैशावर पत्ते खेळत असल्याचा प्रकार त्यांना आढळून आला. यानंतर सदरील प्रकरणात त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या सात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक महामार्ग विभागाचा तर एक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आणि इतर पाच पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस दलातील विविध ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा.आर. यांनी दिली. याप्रकरणी आढळलेल्या प्रकारावरून पुढील गुन्हा नोंद प्रक्रिया करण्यात आली.