सोनपेठ (जि. परभणी) : तालुक्यातील धामोणी येथे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना ग्रामसेवक व सरपंचास शिवीगाळ करून शासकीय कामात दोघांनी अडथळा केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली.
तालुक्यातील धामोणी येथे शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसेवक कुशावर्ता मुंडे या प्रधानमंत्री घरकुल आवास योजना प्रपत्र ड ची यादी सर्वांसमोर वाचत होत्या. त्यावेळी कारभारी लोकरे, मुक्तीराम मुळे यांनी गावातील शुद्ध पाणी फिल्टर प्लांट बंद का, असे विचारले. त्यावर सरपंच सुमन मुळे यांनी आजच्या ग्रामसभेचा विषय घरकुल योजना प्रपत्र ड वाचून दाखविणे या पुरताच आहे. तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाबाबत वेगळी ग्रामसभा घेऊ शकतो, असे मुळे यांनी म्हणताच कारभारी लोकरे व मुक्तीराम मुळे यांनी ग्रामसेवक व सरपंचांना शिवीगाळ केली.
तसेच ग्रामपंचायत सेवक श्रीधर मुळे यांच्या हातातील स्वाक्षरीचे रजिस्टर कारभारी लोकरे व मुक्तीराम मुळे यांनी हिसकावून घेत फाडले व शासकीय कामात अडथळा केला. याची तक्रार कोठे दिल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दोघांनी दिली. तसेच सरपंच सुमन मुळे यांना शिवीगाळ करून ढकलले व जिवे मारण्याची धमकी दिली. ग्रामसेवक कुशावर्ता मुंडे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात कारभारी लोकरे व मुक्तीराम मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विष्णू गिरी हे तपास करत आहेत.