परभणी: जिंतूर तालुक्यातील दुधनगाव येथून परभणीकडे येणाऱ्या ऑटोला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. या धडकेत एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना परभणी तालुक्यातील पेडगाव- पिंपळगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. उत्तम कुसेबा भोंडवे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पेडगाव ते काष्टगाव हा रस्ता गुळगुळीत झाल्याने मागील काही दिवसापासून भरधाव वेगाने वाहने चालविले जात आहेत. विशेष म्हणजे आवश्यक त्या ठिकाणी संबंधित कंत्राटदारांकडून गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांकडून वाहने पळविले जात आहेत. परिणामी, छोट्या- मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुधनगाव येथून परभणीकडे काही प्रवासी घेऊन ॲटो निघाला होता. या ॲटोला पिंपळगाव ते पेडगाव रस्त्यावरील एकरुखा पाटी परिसरात पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने सकाळी दहा वाजेच्या सुमारास जोराची धडक दिली.
या धडकेत उत्तम कुशेबा भोंडवे (७५,रा. दुधनगाव ता. जिंतूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश भोंडवे, दिगंबर भोंडवे, सावित्रा भोंडवे व हरिभाऊ भोंडवे (सर्व रा. दुधनगाव), दुर्गाजी मोरे (रा. पिंपळगाव स. मि., ता. परभणी) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यातील काही जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध तक्रार देण्याचे काम सुरू होते.
परभणी शहरात खरेदीसाठी जात होते प्रवासदुधनगाव हे जरी जिंतूर तालुक्यात असले तरी या गावाला परभणी शहर खरेदी- विक्रीसाठी जवळ पडते. त्यामुळे या गावचा सर्वाधिक ओढा हा परभणी शहराकडे असतो. मंगळवारी सकाळी सात ते आठ प्रवासी दुधनगाव येथून परभणी शहराकडे निघाले होते. परंतु, एकरुखा पाटी परिसरात पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या ऑटोला जोराची धडक दिली. यामध्ये पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाला आपला जीव गमावा लागला.