- सत्यशील धबडगे
मानवत: तालुक्यातील ताडबोरगाव शिवारात पाथरी-परभणी रस्त्यावर एका शेतात 58 वर्षीय देविदास भोकरे (वय 58 ) यांचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. मानेवर धारदार शस्त्राने वार केलेला असल्याने हा घातपाताचा संशय असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. तपासात मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात गॅंगमन म्हणून कार्यरत असलेले दत्तत्रय देविदास भोकरे वय 58 यांना बाबासाहेब भोकरे आणि परमेश्वर भोकरे हे दोन मुलं आहेत. यापैकी परमेश्वर भोकरे यांच्याकडे वडील राहत असत. वडिलांना काम होत नसल्याने परमेश्वर वडिलांच्या जागी कामावर जात असे. घर खर्चासाठी वडिलांकडून पैसे मिळत असत मात्र काही दिवसांनी वडिलांनी परमेश्वरला घरखर्चाला पैसे देणेबंद केले. यामुळे परमेश्वरने त्यांचे जेवण बंद केले. त्यामुळे दत्तात्रय भोकरे यांनी परमेश्वरकडे राहणे बंद केले.
दरम्यान, 24 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वडील दत्तात्रेय आणि भाऊ परमेश्वर यांना पाथरी- परभणी रस्त्यावर ताडबोरगाव येथील साईकृपा हॉटेलच्या मागे शेतात जाताना बाबासाहेब भोकरे याने पाहिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 एप्रिल रोजी सकाळी दत्तात्रय भोकरे यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस तपासात घरखर्चाला पैसे न देता मित्रांसोबत दारू पिण्यात पैसे उडवत असल्याच्या रागातून मुलगा परमेश्वर याने वडिलांचा खून केल्याचे समोर आले.
याप्रकरणी बाबासाहेब भोकरे यांच्या तक्रारीवरून परमेश्वर भोकरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोउनि किशोर गांवडे करत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अध्यक्ष आर राग सुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी गोफणे, पोलीस निरीक्षणक रमेश स्वामी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.