परभणी : पीक विम्याच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित राहिल्याने या प्रश्नी आज पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्हा भरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पीक विम्याच्या प्रश्नावर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे. २५ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु असून या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या अंतर्गत गुरुवारी जिल्हाबंदची हाक दिली होती. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही या आंदोलनाचा पाठिंबा दर्शविला आहे. शहरात सकाळी १० वाजेच्या सुमारास बाजारपेठेतील काही दुकाने उघडली होती; परंतु, एक ते दीड तासाच्यानंतर ही दुकाने बंद करण्यात आली. बाजारपेठ भागातील सर्व दुकाने बंद राहिली.
व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिन अंबिलवादे, संजय मंत्री आदींनी उपोषणस्थळी बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला. जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोनपेठ, पूर्णा, जिंतूर, मानवत, पाथरी आणि सेलूतही बाजारपेठ कडकडीत बंद राहिली.