परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या सात आगारांतर्गत ५५३ बसेसची संख्या आहे. त्यातील ७७ बसेसला दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. यासाठी ८४८ चालक व ४४३ वाहकांची संख्या आहे. कोरोनापूर्वी या सात आगारातून ३७६ बसेसच्या माध्यमातून दिवसागणिक १८५६ बसफेऱ्या करण्यात येत होत्या. त्यातून दिवसागणिक एसटी महामंडळाला ३६ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र त्यानंतर मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. परिणामी बससेवा बंद करण्यात आली. अनलॉकमध्ये बससेवा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत १३१५ बसफेऱ्या दिवसागणिक होत आहेत. यातून एसटी महामंडळाला ३२ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
इतर जिल्ह्यांपेक्षा परभणीची स्थिती उलट
इतर जिल्ह्यात प्रवासी मिळत नसल्याने बसफेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. मात्र परभणी जिल्ह्यात या उलट परिस्थिती असून, मुंबई येथे देशसेवेसाठी जिल्ह्यातील ४०० कर्मचारी २१ नोव्हेंबर रोजी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत परभणीत विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याची स्थिती उलट आहे.
जिल्ह्याचे बसचे उत्पन्न आले बरोबरीत
एसटी मंडळाच्या सात आगारात कोरोनापूर्वी मार्च महिन्यात १८५६ बसफेऱ्यांमधून दिवसाला ३६ लाख ४७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. कोरोनानंतर १३१५ बसफेऱ्या दिवसागणिक होत असून, ३२ लाख २९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात बसचे उत्पन्न कोरोनानंतर पूर्वपदावर येत आहे.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा
परभणी जिल्ह्यातील वाहक व चालक मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात आले आहेत. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यात बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने बससेवेसाठी पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठविणे गरजेचे आहे.
विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यात ४ व हिंगोली जिल्ह्यात ३ असे एकूण ७ आगार आहेत. कोरोनाआधी १८५६ बसफेऱ्या होत होत्या. आता १३१५ बसफेऱ्या सुरू आहेत. या बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून, उत्पन्नातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनानंतर एसटी महामंडळाची स्थिती पूर्वपदावर येत आहे.
- मुक्तेश्वर जोशी,
विभागीय नियंत्रक, परभणी