लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाचे वेध आता जिल्हा प्रशासनाला लागले असून, पहिल्या टप्प्यामध्ये ४७ वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत़ या लिलावाची प्रक्रियाही सुरू झाली आहे़ त्यामुळे वाळू घाट लिलावातून प्रशासनाला मोठा महसूल मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे़दरवर्षी जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव होतात आणि या लिलावातून कोट्यवधी रुपयांचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत भर घालतो़ यावर्षी देखील ही लिलाव प्रक्रिया होणार आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी, पूर्णा आणि दूधना या तीन मोठ्या नद्या असून, या नदीकाठावरील वाळू घाटांचे अधिकृत लिलाव केले जातात़ यावर्षी ११९ वाळू घाटांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; परंतु, पर्यावरण विभागाने केवळ ५५ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये ४७ वाळू घाटांचा लिलाव केला जाणार आहे़ ई निविदा प्रक्रियेद्वारे आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत़ परभणी जिल्ह्यातील ४२ आणि परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या ५ अशा ४७ वाळू घाटांचा लिलाव होणार आहे़ १७ नोव्हेंबर रोजी या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ११ डिसेंबर रोजी अंतीम लिलाव होणार आहे़परभणी जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, वाण, बोरणा, करपरा, दूधना या नद्या प्रवाही आहेत़ या नद्यांच्या प्रवाहामुळे जिल्ह्यातील जमीन सुपिक असून, शेतकºयांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होते़ या नद्यांमधील वाळू विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया घेतली जाणार आहे़ या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, त्यातून प्रशासनाला मोठे उत्पन्न मिळणार आहे़
वाळू घाटांच्या लिलावास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:59 PM