परभणी : राज्य शासनाने विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र परभणीतील शासकीय ग्रंथालय बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे शासकीय ग्रंथालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
कोरोना कालावधीपासून शासकीय ग्रंथालय बंद करण्यात आले. यामुळे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करीत होते. मात्र सध्या सर्व काही अनलॉक झाले आहे.
यात शासनानेही विविध विभागांची भरतीप्रक्रिया जाहीर केली आहे. यानुसार या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना शासकीय ग्रंथालय सुरू असणे आवश्यक आहे. यामुळे ग्रंथालय त्वरित सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनावर गंगाधर यादव, दीपक वारकरी, इम्तियाज शेख, वैभव शिंदे, कांचन दळवी, संयम जैन, सुमित घनसावंत, सुनील पवार, माधव वजीर, यश कुलकर्णी, आकाश चाफेकानडे, भूषण जाधव, संकेत देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.