परभणी : महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या योनेक्स सनराईज वरिष्ठ आंतर जिल्हा व राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्याचा मान परभणी जिल्हा बॅडमिंटन संघटनेला मिळाला असून, येत्या १३ ते १८ आॅगस्ट या काळात येथील बॅडमिंटन हॉल आणि श्री शिवाजी महाविद्यालयात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात ८ आॅगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, सचिव रविंद्र देशमुख, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख, आशिष शहा, सुधीर मांगूळकर आदींची उपस्थिती होती.१३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, १३ व १४ आॅगस्ट रोजी थॉमस व उबेर चषक नियमानुसार सांघिक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर १५ ते १८ आॅगस्ट या काळात वैयक्तीक स्पर्धा होणार आहेत. त्यात पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी या गटाचा समावेश आहे. सांघिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण १५ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून, वैयक्तीक स्पर्धेचे पारितोषिक वितरण १८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता होणार आहे.
ही स्पर्धा सिंथेटीक हुआ कोर्ट मॅटवर खेळविली जाणार आहे. स्पर्धेत महाराष्टÑातून २५ जिल्ह्यातून जवळपास ३०० ते ३५० खेळाडू सहभागी होणार असून, स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी आ.डॉ.राहुल पाटील, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसुदन केंद्रे, आ.बिप्लव बाजोरिया यांचे सहकार्य लाभल्याची माहिती आयोजन समितीने दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी परभणी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष विजय जामकर, उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे, सचिव रविंद्र देशमुख, आशिष शहा, सुधीर मांगूळकर, उन्मेश गाडेकर,श्याम जेथलिया, पांडुरंग कोकड, नरेंद्र झांझरी, विनोद जेठवाणी, रफिक वाघाणी, भगवान कोठारी, अमोल ओझळकर, विकास जोशी, सागर पातूरकर, इंद्रजीत वरपूडकर, सुनील देशमुख आदी परिश्रम घेत आहेत.