प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कडाक्याच्या थंडीत सार्वजनिक ठिकाणांचा सहारा घेत शहरातील अनेक बेघरांना रात्र जागून काढावी लागत आहे. हक्काच्या निवाºयाची ऊब नशिबात नसल्याने हे बेघर मिळेल त्या ठिकाणी रात्रभर कुडकुडत पडलेल्या अवस्थेत असल्याचे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास केलेल्या पाहणीत दिसून आले़महिनाभरापासून वातावरणात बदल झाला आहे़ दिवसेंदिवस गारवा वाढत असून, थंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत़ अशा परिस्थितीत बेघरांची रात्र कशी असेल, याची पाहणी केली तेव्हा सार्वजनिक ठिकाणांनाच रात्रीचा निवारा करून जगणारे अनेक बेघर पहावयास मिळाले़ परभणी शहर हे रेल्वे जंक्शनचे ठिकाण असून, येथून शेकडो नागरिक प्रवास करतात़ काही जण रोजीरोटीसाठीही शहरात दाखल होतात़ त्यामध्ये भीक मागून किंवा छोटा मोठा व्यवसाय करून जगणाºयांची संख्या अधिक आहे़ थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे कपडे किंवा पांघरून नसताना अशाही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी ही मंडळी रात्र काढत असल्याचे दिसून आले़ शहरातील जिल्हा स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात एका बेघराने मागील दोन महिन्यांपासून झाडाखालीच निवारा शोधला आहे़ फाटके तुटके कपडे जमा करून त्याच कपड्यांना पांघरून म्हणून हा वृद्ध रात्र काढत आहे़ काही समाजसेवींनी त्याला पांघरून व इतर कपडेही पुरविले. परंतु, हा तात्पुरता उपाय असून, त्याचा निवाºयाचा प्रश्न कायमच आहे़ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवरही मानसिक रुग्ण असलेल्या एका व्यक्तीने आपला निवारा म्हणून वापर सुरू केला आहे़ कडाक्याच्या थंडीतही हा व्यक्ती संरक्षक भिंतीवरच रात्र काढत असून, त्याच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा अजूनही संवदेनशील झाली नसल्याचे दिसत आहे़ रात्री ११़३० वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाला भेट दिली तेव्हा या ठिकाणी तर अनेक जण उघड्यावरच झोपलेले दिसून आले़ रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी रात्र काढली़ तर स्थानक परिसराला ज्यांनी दररोजचा निवारा शोधला, अशा १० ते १२ जणांनी स्थानकाच्या परिसरात उघड्यावरच बस्तान मांडल्याचे पहावयास मिळाले़ आॅटोरिक्षाची पार्किंग असलेल्या कठड्यावर आणि दुचाकी पार्किंगच्या परिसरात झाडाखाली ५ ते ६ बेघर परिवारासह झोपलेले दिसून आले़ रेल्वेस्थानकाच्या आतील बाजुसही अनेक कुटूंब, बेघर व्यक्तींनी बस्तान मांडले. बसस्थानकातही ३ बेघरांनी निवारा शोधल्याचे पहावयास मिळाले़ त्यात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे़ तिघांनाही निवारा नसल्याने बसस्थानकच त्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले़ लोहार काम करणाºया एका परिवाराने उड्डाणपुलाखालीच निवारा तयार केला आहे़ त्याचप्रमाणे शनि मंदिर, दर्गा रोड परिसर या ठिकाणीही बेघर रस्त्याच्या कडेलाच झोपल्याचे दिसून आले़शंभर बेघरांची : होणार व्यवस्थामहापालिकेच्या वतीने साखला प्लॉट भागातील सर्वे नंबर ५०८ मध्ये रात्रनिवारा उभारण्याचे प्रस्तावित केले आहे़ या ठिकाणी नवीन बांधकाम केले जाणार असून, रात्र निवाºयात पिण्याचे पाणी, वीज, पलंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत़ त्यामुळे हा रात्र निवारा उभारल्यास बेघर व्यक्तींची गैरसोय दूर होऊ शकते़ सध्या हिवाळ्याचे दिवस असून, उघड्यावर रात्र काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ ही बाब लक्षात घेऊन रात्र निवाºयाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़६९ बेघरांची नोंदणीमहापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार २०११ च्या जनगणनेनुसार परभणी शहरात ६९ बेघर व्यक्ती असून, या व्यक्तींसाठी रात्र निवारा उभारण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे़ परंतु, रात्र निवाºयाच्या उभारणीतही अडथळे निर्माण होत आहेत़
परभणीतील स्थिती :बेघरांना मिळेना रात्र निवाºयाची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:20 AM