लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकेतील अग्निशमन विभागामध्ये कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामे चालविली जात आहेत. धोकादायक पद्धतीने कामे केल्यानंतरही या कर्मचाºयांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने अग्निशमनच्या कर्मचाºयांसमोर समस्यांचा डोंगर उभा टाकला आहे.परभणी महापालिकेसह जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड आणि पूर्णा नगरपालिकेमध्ये अग्निशमन विभाग कार्यरत आहे. या सर्वच विभागामध्ये कंत्राटी कर्मचाºयांवरच कारभार चालत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक विभागात कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. काही नगरपालिकांमध्ये कंत्राटी स्वरुपात कर्मचारी घेण्यात आले आहेत. तर काही पालिकांमध्ये नगरपालिकेतील कर्मचाºयांवरच अग्निशमन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगी सारख्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या विभागातील कर्मचाºयांच्या भरतीकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. एकाही विभागात पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अग्निशमन विभागाचा कारभार कंत्राटी कर्मचाºयांवरच अवलंबून असल्याचे दिसत आहे. २४ तास सेवा असलेल्या या विभागामध्ये तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचाºयांची भरती करण्यात आली आहे. या कर्मचाºयांना मुबलक प्रमाणात वेतनही दिले जात नाही. त्यामुळे जिवाशी खेळ करुन आग विझविण्याचे जिकिरीचे कामे कर्मचाºयांना करावी लागतात. तेव्हा नगरपालिका आणि महापालिकेअंतर्गत अग्निशमन विभागात कायमस्वरुपी कर्मचाºयांची भरती करावी, अशी मागणी होत आहे.परभणी महापालिकेत ६० पदे रिक्त४सुमारे सव्वा तीन लाख लोकसंख्येसाठी परभणी महापालिकेत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागात अग्निशमन अधिकाºयांची ३, उपअग्निशमन अधिकाºयांची २, लीडिंग फायरमनची ९, वाहन चालकाची १५ आणि फायरमनची ६० पदे आकृतीबंधानुसार मंजूर आहेत. १९८० मध्ये परभणीत अग्निशमन विभाग सुरु झाला. मात्र स्थापनेपासून या विभागात कायमस्वरुपी कर्मचारी भरती झाली नाही. त्यामुळे आकृतीबंधात मंजूर असलेली सर्वच्या सर्व पदे रिक्त असून कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी घेऊन या विभागाचा कारभार चालविला जात आहे. सध्या या विभागात १ अग्निशमन अधिकारी आणि ६ फायरमन, ३ चालक असे मनुष्यबळ असून एवढ्या तुटपुंज्या मनुष्यबळावरच अग्निशमनचा कारभार चालवावा लागतो. विशेष म्हणजे कर्मचाºयांनी सहा महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे; परंतु, या कर्मचाºयांना पुरेसे मानधन मिळत नाही.तालुक्याच्या ठिकाणीही दुरवस्थाचपरभणी महापालिकेसह पूर्णा नगरपालिकेमध्ये देखील हा विभाग कार्यरत आहे. या ठिकाणी ४ फायरमन आणि १ चालक अशा ५ रोजंदारी कर्मचाºयांवर अग्निशमनचा गाडा चालविला जातो. मानवत शहरामध्ये ६ पदे मंजूर आहेत. त्यात एक अधिकारी, एक चालक आणि चार फायरमनचा समावेश असून ही सर्व पदे रोजंदारी स्वरुपात भरली आहेत. सेलू शहरातील अग्निशमन दलात ५ पदे मंजूर असून त्यात एक अग्निशमन अधिकारी, एक चालक आणि तीन फायरमनचा समावेश आहे. ही पाचही पदे रिक्त असून सध्या कंत्राटी कामगार व अप्रशिक्षित कर्मचाºयांच्या माध्यमातून अग्निशमनचा कारभार चालविला जात आहे.४सोनपेठ नगरपालिकेत अग्निशमन विभागात ६ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये १ सहाय्यक अग्नीशमन पर्यवेक्षक, ४ फायरमन आणि एका चालकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही सर्व पदे कंत्राटी स्वरुपात घेण्यात आली आहेत. पाथरी नगरपालिकेमध्ये अग्निशमनच्या दोन गाड्या असून फायरमनची चार पदे भरलेली आहेत. या कर्मचाºयांना मुंबई येथे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच एक पर्यवेक्षक, एक चालक अशी अन्य दोन पदे मंजूर असून त्यापैकी चालकाचे पद रिक्त आहे.कर्मचाºयांना मिळेना सुरक्षा४अग्निशमन विभागामध्ये तुटपुंज्या पगारावर काम करणाºया या कर्मचाºयांच्या सुरक्षेसंदर्भात मात्र प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे दिसत आहे. आग विझविण्यासाठी या कर्मचाºयांना जोखमीची कामे करावी लागतात. त्यामुळे अग्निशमन विभागात काम करणाºया कर्मचाºयांना पुरेसी सुरक्षा पुरविण्याबरोबरच त्यासाठी लागणाºया साहित्याची उपलब्धता करुन देणे आवश्यक आहे. आग विझविण्यासाठी जाणाºया या कर्मचाºयांना हेल्मेट, हातमोजे, फायरप्रूफ जॅकेट, गम बूट आदी साहित्य पुरविणे आवश्यक आहे. पूर्णा नगरपालिकेसह काही पालिकांमध्ये हे साहित्य पुरेस्या प्रमाणात उपलब्ध नाही. तसेच एकाही पालिकेने कर्मचाºयांसाठी हेल्मेट उपलब्ध करुन दिले नसल्याने अग्निशमन दलातील कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गंगाखेडचा कारभार तीन कर्मचाºयांवर४गंगाखेड नगरपालिकेतील अग्निशमन विभागाचा कारभार केवळ ३ कर्मचाºयांवर चालतो. त्यामुळे या विभागातील कर्मचाºयांची दमछाक होत आहे. पालिकेने खरेदी केलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना परभणी येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यातील काही कर्मचारी पुरवठा विभागात तर काही कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने या विभागाचा संपूर्ण भार फायरमनचे प्रशिक्षण घेतलेल्या शामराव जगतकर यांच्यावर पडला आहे. त्यांच्या मदतीसाठी चालक रामविलास खंडेलवाल व स्वच्छता विभागातील कामगार रतन साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागात कर्मचाºयांची संख्या अत्यंत तोकडी असल्याने कर्मचाºयांवर ताण येत आहे.
परभणी जिल्ह्यातील स्थिती :कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच अग्निशमन दलाचा डोलारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:18 PM