देवगावफाटा (परभणी): गटशिक्षणाधिकारी कार्यालयास चोरून वीज देणे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या चांगलेच अंगलट आले आहे. वीज चोरी प्रकरणात मुख्याध्यापिका एस.एस.वेडे या दोषी आढळल्या आहेत. त्यांच्यावर महावितरणने कारवाई केली असून २४ हजार १६० दंड व २९ हजार ५० रूपये वीज बिल भरावे लागणार आहेत.
सेलू येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ४५ हजार रुपये वीज बिलाची थकबाकी असल्याने सहा महिन्यांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र, कार्यालय सहा महिन्यांपासून शेजारील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातून अनधिकृतरीत्या जोडणी करून वीज वापरत असल्याचे १८ मे रोजी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता पि.आर.थोरात यांच्या निदर्शनास आले. थोरात यांनी पंचनामा करून वीज चोरीसाठीचे वायर जप्त केले.याप्रकरणाची उपकार्यकारी अभियंता डि.टी.तेलंगधरे यांनी गंभीर दखल घेतली.
त्यानंतर विद्यालयाच्या वीज मिटरची पाहणी करून कनिष्ठ अभियंता थोरात यांनी अहवाल कार्यालयास सादर केला. चौकशीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास अनधिकृतपणे वीज देण्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. एस. वेडे या दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यांच्यावर वीजचोरी कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानुसार त्यांना २४ हजार १६० रूपये दंड आणि २९ हजार ५० रूपये वीज बिल भरावे लागणार आहे.
दरम्यान, ही रक्कम वसतिगृहाच्या अनुदानातून कशी भरता येईल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. डी. साबळे यांनी कार्यालयाचे ४५ हजार रूपये वीज बील नियमीत भरले असते तर मुख्याध्यापीका एस.एस.वेडे यांच्यावर ही वेळ आली नसती अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.