परभणी: यापुढे एकही नवीन रुग्ण होऊ द्यायचा नाही, कलंक आणि भेदभाव निर्माण करणाऱ्या या आजाराचे उच्चाटन करून एड्स मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण व आरोग्य विभागाने केला आहे. हे ध्येय गाठण्यासाठी परभणी जिल्हा नियंत्रण व प्रतिबंध विभागानेही एक पाऊल पुढे टाकले आहे. २०१० मध्ये एचआयव्ही नवीन बाधित रुग्ण हे ११५५ होते. तेच २०२३ मध्ये केवळ ११२ रुग्णांवर आले आहे. त्यामुळे शून्य गाठण्याच्या दिशेने परभणी जिल्हा आरोग्य विभाग त्याचबरोबर एआरटी सेंटरच्या वतीने एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे.
भारतात एचआयव्ही आजाराची लागण आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आजार किती गंभीर आहे याची कल्पना येते. संपूर्ण जगालाच या आजाराने काळजी टाकले होते. मात्र जागतिक आरोग्य संघटना आणि एड्स निर्मूलनाचे काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेऊन मोठी जनजागृती केली. या आजाराने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे. आता मृत्यूचे हे प्रमाण शून्यावर आणण्याचा संकल्प करून आरोग्य विभाग आणि एड्स निर्मूलनाचे काम करणाऱ्या संस्था त्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहेत. १ डिसेंबर या जागतिक दिनाचे औचित्य साधून परभणी जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा नियंत्रण व प्रतिबंधक विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला असता परभणी जिल्ह्याचे शून्य गाठण्याच्या दिशेने होणारी धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.
सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील एआरटी विभागात सद्यस्थितीत ११६ रुग्ण या वर्षात पॉझिटिव्ह आहेत. दुसरीकडे ७ हजार ५०० रुग्णांची नोंदणी आहे. २००७ पासून संपूर्ण सोयी, सुविधांचा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयासह इतर सात ग्रामीण रुग्णालयातही लिंक सेंटर स्थापन केले आहेत. या केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती केली असून केंद्रात येणाऱ्या एचआयव्ही बाधित रुग्णांच्या सर्व तपासण्या समुपदेशन आणि औषधोपचार मोफत केला जातो.एड्स नियंत्रण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले, जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रातून समुपदेशन एचआयव्ही तपासणी केली जाते. तसेच २४ पीपी सेंटर खाजगी रुग्णालयात असून त्या ठिकाणी येणाऱ्या गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी केली जाते. परभणी जिल्ह्यात दोन व हिंगोली जिल्ह्यातील तीन रक्त साठवण केंद्र कार्यानित आहेत. एड्स जनजागृतीवरही भर देण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यात एड्स प्रमाण मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर घटले असल्याचे आकडेवारी दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यात सहा लिंक एआरटी सेंटर जिल्ह्यात संपूर्ण सोयी सुविधांसह २००७ पासून एआरटी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयासह सेलू, गंगाखेड, मानवत, जिंतूर, बोरी आणि पाथरी या ग्रामीण रुग्णालयातही एआरटी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणीही एचआयव्ही बाधित रुग्णांची मोफत तपासणी, समुपदेशन, उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता उपचार घ्यावेत.
नवीन रुग्ण संक्रमण दर आला ०.३४ वरपाच वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये साधारणपणे ३०० पेक्षा अधिक रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह येत होते. परंतु जनजागृती त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालय विभागातील एआरटी सेंटर व प्रशासनाच्या वतीने यामध्ये मोठी जनजागृती झाली. त्यामुळे नवीन रुग्ण संक्रमण दर हा १.१४ वरून थेट ०.३४ वर आला आहे. त्यामुळे शून्य गाठण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.
एआरटी सेंटरमध्ये उपचार घ्यावेत''एचआयव्ही बाधित माता, पितांकडून बालकास होणारे संक्रमण टाळण्यावर विशेष भर दिला जातो. तसेच रुग्णांनी घाबरून न जाता एआरटी सेंटरमध्ये उपचार घ्यावेत, त्याचबरोबर शून्य गाठण्याच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे आहोत.- डॉ. मंजुषा कुलकर्णी, विभाग प्रमुख
नवीन रुग्ण संक्रमण दर वर्ष निहाय2010: 1155, 2011: 944, 2012: 843, 2013:600, 2014:533, 2015: 507, 2016: 423, 2017: 382, 2018: 334, 2019: 286, 2020: 274, 2021: 130, 2021: 130, 2022: 153, 2023: 166, October 2023: 112