परभणी : शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी आहारातील अनियमियता आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे ॲनिमियाची समस्या सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. एका सर्वेक्षणानुसार सर्वच वयोगटातील ५० टक्के नागरिकांमध्ये ॲनिमियाचा त्रास असतो. त्यामुळे शरीर सुदृढतेबरोबरच पोषक आहारावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अलीकडच्या काळात नागरिक आरोग्याच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. मॉर्निंग वॉक, योगा करुन शरीर सुदृढ राहण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आहाराच्या बाबतीत अजूनही जागरुकता झालेली नाही. त्यात अनियमित आहार घेणे, जंक फूडचा वापर यामुळे शारीरिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण अधिक आहे. २६ नोव्हेंबर रोजी जगभरात ॲनिमिया दिन साजरा केला जातो. तर हा ॲनिमिया नेमका काय आहे? तो होऊ नये यासाठी काय केले पाहिजे? या विषयी येथील वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. संदीप कार्ले यांनी विस्ताराने सांगितले.
शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी तसेच शरीराचे दैनंदिन कार्य योग्य प्रमाणात चालण्यासाठी हिमोग्लोबिनचे (लाल रक्तघटक) प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे; परंतु भारतामध्ये लहान मुले, युवक तसेच गर्भवती महिला, स्तनदा माता आदी सर्वच वयोगटात ५० ते ६० टक्के व्यक्तींमध्ये शरीरात रक्ताचे प्रमाण कमी (ॲनेमिया) असण्याची समस्या आढळते. गर्भवती स्त्रियांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही. शरीरामध्ये लोह, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक ॲसिडची कमतरता व आहारातील इतर त्रुटी हे ॲनिमियाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने संतुलित आहार घेणे व त्याचबरोबर जाणीवपूर्वक अंगामध्ये रक्ताचे प्रमाण वाढवणारे अन्नपदार्थ खाणे आवश्यक आहे.
आहारात काय असाव?शाकाहारी अन्नामध्ये लोह नॉनहिम प्रकारामध्ये उपलब्ध असते तर मांसाहारी अन्नामध्ये हिम प्रकारचे लोह असते. आपल्या आतड्यांना हिम प्रकारचे लोह शोषून घेणे तुलनेने सोपे जाते. त्यामुळे शाकाहारी आहारात फळे व हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, बीटा कॅरोटीन या घटकांमुळे आतड्यांना नॉन हिम प्रकारचे लोह शोषून घेण्यास मदत होते. विशेषत: शाकाहारी व्यक्तींच्या आहारात योग्य प्रमाणात फळे, भाज्या, डाळी, कडधान्य यांचे मिश्रण असावे.
ॲनिमियाचे दुष्परिणामसतत थकवा जाणवतो, मुलांची वाढ कमी होते. कुपोषण होते. मुले हट्टी व चिडचिडी होतात. मेंदूच्या वाढीवर परिणाम होतो. प्रतिकारक्षमता कमी होते. सतत आजारी पडतात. शेवटी वजन, उंची वाढीवर विपरीत परिणाम होतो.
संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मुलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक असणे ही उत्तम आरोग्याची व बौद्धिक विकासाची गुरुकिल्ली आहे. मुलांना पौष्टिक आहार खाऊ घालणे हे केवळ आईचे काम नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे.- डॉ. संदीप कार्ले