गंगाखेड: दोन वर्षांपासून थकीत असलेल्या दुष्काळी अनुदानासाठी डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने गंगाखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दि. २१ सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर बोंबले आंदोलन केले आणि महसूल प्रशासनाला निवेदन दिले.
२०१८ साली तालुक्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळ परिस्थितीमुळे राज्य शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना ६८०० रुपये याप्रमाणे एकूण ४१ कोटी रुपये दुष्काळी अनुदान घोषित केले होते. मात्र दोन वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. धरणे आंदोलन, रूमना मोर्चा काढून वारंवार अनुदानासाठी मागणी केली तरी प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे डोंगरी विकास जन आंदोलनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बोंबले आंदोलन केले.
डोंगरी विकास जन आंदोलनाचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे, दशरथ मोटे, सीताराम देवकते, बालासाहेब गुट्टे, विनायक मोते, नागनाथ गरड, विवेक मुंढे, लक्ष्मण भालेराव यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.