मानवत (परभणी ) : शहरातील शासकीय गोदामातील साखरेचे पन्नास किलोचे १४ पोती चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि.२ ) उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपयाचे स्वस्त धान्य ठेवण्यात येत असलेल्या या गोदामास साधी सुरक्षा भिंत नसून अद्याप वीजसुद्धा उपलब्ध नाही.
आठवडे बाजार येथे असलेल्या शासकीय गोदाम परिसरातील दक्षिण बाजुस असलेल्या गोदामात साखरेची ६० पोते ठेवण्यात आली होती. गुरुवारी (दि. १) नायब तहसीलदार शेख वसिम, गोदामपाल राजेश अवचार यांनी गोदामातील मालाची नोंद घेऊन गोदाम कुलुपबंद केले होते. शुक्रवारी (दि. २) येथे नियुक्त असलेले वॉचमन हमीद यांना सकाळी ८ च्या दरम्यान गोदामात चोरी झाल्याचे लक्षात आले. यावरून त्यांनी चोरीची माहिती गोदामपाल अवचार यांना दिली.
यानंतर प्रभारी तहसीलदार नकुल वाघुंडे, पुरवठा अधिकारी शेख वसीम यांनी गोदामाकडे धाव घेतली. यावेळी गोदामात ठेवलेल्या साखरेच्या ५० किलोच्या पोत्यांचे मोजमाप केले असता त्यातील १४ पोती कमी आढळून आली. त्याची बाजारातील किंमत १३ हजार ५०० रुपये एवढी आहे. यावरून गोदामपाल अवचार यांच्या तक्रारीवरुन चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बीटजमादार साळवणे करीत आहेत.
विजेविना होते गोदामाची सुरक्षास्वस्त धान्य दुकानासाठीचे लाखो रुपयाचे धान्य व इतर माल या शासकीय गोदामात ठेवण्यात येतो. मात्र येथे गोदामाच्या सुरक्षेची कसलीही काळजी घेण्यात येत नाही. सीसीटीव्ही सोडाच पण येथे अद्याप वीज सुद्धा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या बाबतीत प्रभारी तहसीलदार वाघुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विज व सुरक्षा भिंत यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. दरम्यान गोदामाच्या भिंतीस असलेली एक खुली खिडकी आज बुजविण्यात आली आहे.