लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: तालुक्यातील दुसलगाव शिवारात महसूल प्रशासनाने जप्त केलेल्या साठ्यातील वाळू अज्ञात लोकांनी चोरुन नेल्याची घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे.गंगाखेड तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रात्र-दिवस जेसीबीच्या सहाय्याने उपसा करुन वाळू साठे निर्माण केले जात आहेत. तालुका महसूल प्रशासनाने चालू वर्षामध्ये १५९ साठे जप्त करुन लिलावही पुकारला होता. यातील ६४ साठ्यातून ८० लाख रुपयांचा महसूल जमा झाला. महसूल प्रशासन कारवाई करीत असले तरी माफीया मात्र वेगवेगळे फंडे वापरुन साठे निर्माण करीत आहेत. गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळ सावंगी आदी भागातील वाळू नेण्यास खळी येथील ग्रामस्थ विरोधी करीत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे १७ नोव्हेंबर रोजी तक्रार केली होती. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी तहसीलदार आसाराम छडीदार यांना कारवाई संदर्भात सूचना दिल्या होत्या. तहसीलच्या पथकाने दुस्सलगाव शिवारात जावून पाहणी केली असता वाळूचे ढिगारे आढळून आले. महातपुरी सज्जाचे तलाठी शिवाजी मुरकुटे यांनी १८ नोव्हेंबर रोजी घटनास्थळी जावून यशवंत वाकळे, बालासाहेब भांबरे, पंडित सोळंके, नामदेव मात्रे, अशोक मुळे आदी पंचासमक्ष अंदाजे १५ ते १६ ब्रास वाळूचा साठा जप्त करुन पोलीस पाटील संगीताताई कचरे यांच्या ताब्यात दिला होता. परंतु, जप्त केलेल्या साठ्यातील २ ब्रास वाळू अज्ञात वाहन चालकाने चोरुन नेल्याची तक्रार १९ नोव्हेंबर रोजी पोलीस पाटील कचरे यांनी तहसील प्रशासनाकडे दिली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
जप्त साठ्यातील वाळुही चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:16 AM