लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुरुच असून शुक्रवारी सोनपेठ तालुक्यात एका बसवर दगडफेक करण्यात आली. तर शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले.सोनपेठ तालुक्यातील कोठाळा या गावाजवळ शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सोनपेठहून गंगाखेडकडे जाणारी एम.एच.०६-एस.८५७६ ही एस.टी.बस रस्त्यावर दगड लावून अडविली. त्यानंतर चालकाने बस थांबविली. त्यानंतर शेजारील शेतातून युवक बससमोर आले व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर बसमधील प्रवासी खाली उतरले. त्यानंतर सात ते आठ युवकांनी बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद चालक मधुकर कुकडे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिली. यावरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार संतोष मुपडे करीत आहेत. दरम्यान, सोनपेठ येथेच सकाळी १० वाजता शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवून मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नामदेव महाराज फपाळ यांनी कीर्तनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृहपभणी- मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच जिल्ह्याच्या ठिकाणी ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. या वसतिगृहामध्ये पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहाचे बांधकाम होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात कृषी विद्यापीठाच्या परिसरात वापरात नसलेल्या इमारती ताब्यात घेऊन त्यामध्ये सुधारणा करुन त्या ठिकाणी वसतिगृह सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विद्यापीठातील चार इमारतींची शुक्रवारी पाहणी करण्यात आली. त्यामध्ये नागनाथ, वसंत, वसुंधरा व शेतकरी निवास या इमारतींचा समावेश आहे. या इमारतींची दुरुस्ती करुन तातडीने सुविधा उपलब्ध करुन द्या, असे आदेश जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला दिले असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, कुलगुरु डॉ.अशोक ढवन, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, कुलसचिव गजेंद्र लोंढे, प्राचार्य गोखले, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, गणेश रोकडे आदी उपस्थित होते.मानवतमध्ये १०१ नारळांचा नवसमानवत शहरात तहसील कार्यालयासमोर १३ व्या दिवशीही धरणे आंदोलन सुरुच आहे. या अंतर्गत शुक्रवारी सकाळी आंदोलकांनी १०१ नारळ फोडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाला नवस केला. तालुक्यातील सोमठाणा ग्रुप ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा ठराव मंजूर केला. यासाठी सरपंच राजाराम कुकडे, सदस्य रविकांत निर्वळ, बाबासाहेब भदर्गे, उज्ज्वला निर्वळ, शकुंतला भारती, परमेश्वर निर्वळ, किरण देशमुख, माणिक निर्वळ, गुलाब निर्वळ, संतोष निर्वळ, अनिल निर्वळ आदींनी पुढाकार घेतला.
परभणी जिल्ह्यात सोनपेठमध्ये बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:13 AM