पूर्णा (परभणी) : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालास हमीभाव, परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा आदी मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्यावतीने सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झिरोफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सुरुवातीला आंदोलकांनी शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांबाबत सरकारच्या उदासीन धोरणांचा निषेध केला. यानंतर जिल्हाध्यक्ष नागसेन भरजे, व्यंकटेश काळे यांच्या नेतृत्वात रस्तो रोको करण्यात आला. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्याप्रमाणावर प्रभावित झाली. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालास हमीभाव द्या, परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, स्वामिनाथन आयोगाची शिफारस त्वरित लागू करावी, मराठा-मुस्लिम-धनगर यांना त्वरित आरक्षण द्या आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ए जि खान, पो नि सुनील ओव्हळ, फौजदार गणेश राठोड, गोपनीय विभागाचे किरण शिंदे यांनी वाहतूक सुरळीत करण्यास प्रयत्न केले.