परभणी जंक्शन येथून दक्षिण मध्य रेल्वे विभागातील सर्वच प्रमुख स्थानकांना जाणाऱ्या रेल्वे उपलब्ध आहेत. दक्षिण व उत्तर भारत, तसेच राज्यातील मुंबई, पुणे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. मात्र, सध्या कोरोनाच्या नावाखाली या सर्व रेल्वेचे एसी व शयनयान आरक्षणचे दर वाढविण्यात आले आहेत. ज्या काही डेमू पॅसेंजर व विशेष रेल्वे सुरू आहेत, त्यांचे जनरलचे दिले जाणारे तिकीटही दीडपट वाढविण्यात आले आहे. परिणामी, प्रवाशांचे अतिरिक्त पैसे तिकीट व आरक्षण यातच खर्च होत आहेत. यामुळे पुन्हा कोरोना पूर्वीप्रमाणे रेल्वेचे तिकीट व आरक्षण दर ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
सध्या सुरू असलेल्या स्पेशल रेल्वे
आदिलाबाद-मुंबई (नंदीग्राम)
सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी)
नांदेड-पनवेल
नांदेड-मुंबई (तपोवन)
नांदेड-मुंबई (राज्यराणी)
नांदेड-अमृतसर (सचखंड)
नांदेड-बंगलोर
जनरलचे डबे कधी अनलाॅक होणार
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने या मार्गावर सुरू असलेल्या १२ विशेष रेल्वेंना जनरल डबे जोडले आहेत. मात्र, मराठवाड्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वे उपयोगाच्या नाहीत. विशेष म्हणजे तपोवन, मराठवाडा, नंदीग्राम, देवगिरी, राज्यराणी, पनवेल या गाड्यांना हे जनरल डबे जोडले नाहीत. त्यामुळे या रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जनरल डबे कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
सध्या आरक्षण काढण्यासाठी स्पेशल ट्रेनला दुप्पट भाडे लागत आहे. विशेष म्हणजे हे आरक्षण रद्द करताना अनेकदा एक रुपयाही हाती येत नाही. यामुळे स्पेशल ट्रेनच्या नावाखाली लूट चालू आहे. दुप्पट भाडे कमी करण्याचा, तसेच प्लॅटफॉर्म तिकीट पूर्वीप्रमाणे करण्याचा विचार या विभागातील अधिकारी करीत नाहीत. यामुळे प्रवाशांना सर्वच प्रवासासाठी दुप्पट भाडे लागत आहेत.
स्पेशल भाडे कसे परवडणार
दररोज आरक्षण काढणे शक्य नाही. यात सिझन पास असणाऱ्यांना पॅसेंजर वगळता विशेष रेल्वेला प्रवेश दिला जात नाही. यामुळे स्पेशल भाडे परवडत नाही. सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वेने विचार करावा. - गजू शेळके, पूर्णा.
कोणत्याही वेळी प्रवासाला जाण्याचे काम पडल्यास रेल्वेला जनरल डबे उपलब्ध नाहीत. यात स्पेशल रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी ऐनवेळी स्थानकावर आरक्षण मिळत नाही. अशावेळी रेल्वेत प्रवेश केल्यावर टीसीला अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. - विनोद काळे, पूर्णा.