परभणी : मनपात मागील दीड वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी बंद आहेत. केवळ या कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सोडण्याचे काम कोंडवाडा विभागाच्या वतीने केले जात आहे.
महानगरपालिका प्रशासनात स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मंजूर आहे. मात्र मागच्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त असल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करताना कोंडवाडा विभागाला कसरत करावी लागत आहे. भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे कंत्राट मनपाने एका एजन्सीला दिले आहे. या एजन्सीमार्फत नेमलेले कर्मचारी शहरात फिरून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करतात. एका सत्रात डॉग व्हॅन, तर दुसऱ्या सत्रात इतर मोकाट जनावरे पकडले जातात. दररोज साधारणत: १० मोकाट कुत्रे पकडून मनपाच्या हद्दीबाहेर नेऊन सोडले जातात. मात्र या कुत्र्यांवर नसबंदीची शस्रक्रिया होत नाही. त्यामुळे काही दिवसांनी हेच मोकाट कुत्रे पुन्हा शहरात येऊन उपद्व्याप करतात. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने मनपाने मागील साडेतीन वर्षात किती कुत्र्यांची नसबंदी केली आणि त्यावर किती खर्च झाला, याची माहितीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
चार कर्मचाऱ्यांवरच जबाबदारी
महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागात केवळ चार पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यात कोंडवाडा विभागप्रमुख हे पद प्रभारी स्वरूपात सांभाळले जाते. याशिवाय दोन शिपाई आणि एक वाहनचालक असे कर्मचारी या विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात एजन्सीला काम देऊन शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जात आहे.
सुमारे एक हजार भटके कुत्रे
शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मनपाच्या कोंडवाडा विभागाने घेतलेल्या माहितीनुसार सुमारे एक हजार मोकाट कुत्रे शहरात आहेत. येथील दर्गा रोड भागात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. त्यातील काही कुत्रे पिसाळलेले आहेत. त्यामुळे या कुत्र्यांचा नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. धाररोड परिसरातही भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहराच्या हद्दीबाहेर सोडलेले कुत्रे याच मार्गाने पुन्हा शहरात दाखल होतात. त्यामुळे या भागात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे.
महिनाभरात दहा ते बारा तक्रारी
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करणाऱ्या महिनाभरात साधारणत: १० ते १२ तक्रारी कोंडवाडा विभागाकडे प्राप्त होतात. शक्यतो सर्व तक्रारींचे त्याच वेळी निवारण करण्याचे काम कोंडवाडा विभागातून केेले जाते. मोकाट कुत्र्यांना पकडून शहराच्या हद्दीबाहेर नेऊन सोडले जाते तसेच मोकाट जनावरांना ठरावीक मुदतीनंतर मालक समोर न आल्यास गोशाळेत दाखल केले जाते.