परभणी : आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून येतील, या दृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाथरी येथील संवाद मेळाव्यात केले.
२५ सप्टेंबर रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद मेळावा पार पडला. या प्रसंगी पाटील बोलत होते. सेलू कॉर्नर परिसरात हा मेळावा पार पडला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंग गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, रेखा फड, माजी आ. विजय भांबळे, पक्ष निरीक्षक बसवराज नगराळे, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, डाॅ. संजय रोडगे, न.प. तील गटनेते जुनैद दुर्राणी, नगराध्यक्षा मीना नितीन भोरे, पं.स. सभापती कल्पना थोरात, जि.प. सदस्य दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, दत्तराव मायंदळे, एकनाथ शिंदे, मुंजाजी भाले, पंकज आंबेगावकर, संतोष लाडाने, तबरेज दुर्राणी यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
चार तासांचा उशीर
पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी दुपारी ४ वाजता मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाथरी येथे येण्यास रात्रीचे ८ वाजले. त्यामुळे सायंकाळी ४ वाजेपासून पाथरी, मानवत व सोनपेठ येथील कार्यकर्ते प्रतीक्षेत थांबले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गैरसोय झाली.
बॅनरवरून विटेकर यांचा फोटो गायब
पाथरी मतदारसंघातील सोनपेठ तालुक्यातील राजेश विटेकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या बॅनरवर त्यांचा फोटो दिसून आला नाही. त्यामुळे पाथरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून आले.