पालम (परभणी ) : शहरातील 17 जुलै रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दगडफेक व जाळपोळीची घटना घडली होती रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिस दाखल होताच तणाव निवळला असून गुरुवारी (दि.18) सकाळपासून शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद आहे.
पालम शहरातील गंगाखेड रोड भागात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद झाला़ या वादाचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाले़ या परिसरात तणाव वाढत गेला़ दोन्ही गटांचे समर्थक वाढल्याने मोठा जमाव या परिसरात एकत्र झाला़ वाद विकोपाला जात फळा-फरकंडा रस्ता, बसस्थानक परिसर व नवा मोंढा भागातील काही दुकानांना आग लावण्यात आली, तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य चौकामध्ये टायर जाळण्यात आले़
हा वाद वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली़ सायंकाळी ७ वाजेपासून सुरू असलेला हा वाद मिटत नसल्याने पोलिसांनी इतर ठाण्यांमधून अधिकचा पोलीस बंदोबस्त मागविला़ हा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल होण्यासाठी साधारणत: अर्धा ते पाऊण तास लागला़ या काळात अनेक वाहनांची आणि ३ ते ४ दुकानांची जाळपोळ करण्यात आली़ त्यामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती़ रात्री ९़३० च्या सुमारास पोलिसांचा मोठा ताफा शहरात दाखल झाला असून, रात्री १० वाजेच्या सुमारास शहरात तणावपूर्ण शांतता होती़
आज सकाळपासून परिस्थिती निवळली असून बाजारपेठ मात्र कडकडीत बंद आहे. दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. जागोजाग पोलिसांचा बंदोबस्त असल्याने शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे या दगडफेकीत जखमी झालेले जमादार नामदेव राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अजूनही पालम शहरात तणावपूर्ण शांतता असून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवले आहेत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेली आहे