वीज पुरवठा खंडित झाल्याने हाल
पाथरी : शहरातील वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून खंडित झाला होता. रात्री उशिरा हा वीजपुरवठा पूर्ववत झाला. पाथरी येथील ३३ केव्ही आणि ११ केव्ही लाईनच्या तारांचे घर्षण झाल्याने हा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. महावितरणने काळजी घेण्याची मागणी होत आहे.
सोनपेठ शहरात दिवसाही पथदिवे सुरू
सोनपेठ : शहरात नगरपालिकेच्यावतीने बसविण्यात आलेले पथदिवे दिवसरात्र सुरू राहत आहेत. यामुळे महावितरणच्या वीज बिलात मोठी वाढ होत आहे. नगरपालिकेने पथदिव्यांसाठी टायमर बसविला नसलयाने ही स्थिती ओढवली आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दुकाने बंद; रस्त्यावर मात्र वर्दळ कायम
सोनपेठ : शहरात शासनाने लागू केलेल्या आदेशानुसार व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु, नागरिकांची गर्दी मात्र रस्त्यावर दिसून येत आहे. विशेष म्हणजे जमाव बंदी आदेश लागू असताना अनेक जण एकत्र येऊन गप्पा मारत आहेत.
ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची धांदल
सोनपेठ : सोनपेठ शहर व परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. शेतामध्ये ज्वारीची काढणी काही ठिकाणी सुरू आहे. शिवाय आंब्याला कैऱ्याही लागल्या आहेत. त्यामुळे पाऊस येण्याची भिती वाटत आहे.
हात धुण्याची मशिन बनली शोभेची वस्तू
पालम : शहरातील तहसील कार्यालयात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना हात धुण्यासाठी बसविण्यात आलेली मशीन वापराअभावी बंद पडली आहे. त्यामुळे ती शोभेची वस्तू बनली आहे. तहसील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने ही स्थिती ओढावली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बनवसमध्ये २० जण कोरोना पॉझिटिव्ह
बनवस : पालम तालुक्यातील बनवस येथील आरोग्य केंद्रात दोन दिवसांत २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. गावात बाधितांची संख्या वाढत आहे.
रस्ता तयार करण्याची ग्रामस्थांची मागणी
कुपटा : सेलू तालुक्यातील कुपटा गावातील अंतर्गत रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथे पाऊस पडल्यानंतर चिखल तयार होतो. गावातील मुख्य रस्ता तयार करण्याची मागणी आहे.